नाणार प्रकल्प बाधित जमिनीत उद्धव ठाकरेंच्या मावसभावाची जमीन - निलेश राणे यांचा आरोप

September 24,2020

रत्नागिरी : २४ सप्टेंबर - नाणार प्रकल्पातील बाधित जमिनींमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मावसभाऊ निशांत देशमुख यांची 1,400 एकर जमीन असून सुगी डेव्हलपर्स या कंपनीच्या नावे व्यवहार केले आहेत, असा आरोप माजी खासदार व भाजपा नेते नीलेश राणे यांनी पत्रपरिषदेत केला आहे. अॅंडव्होकेट कवतकर यांनी जमीन खरेदी व्यवहारासंदर्भातील दस्तावेज तयार केला. 2014 पासून 1,400 एकरचे सर्व व्यवहार मर्यादित दायित्व भागीदारीनुसार झाल्याचे त्यांनी सांगितले.

नाणार प्रकल्पात शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी परप्रांतीयांना सुमारे 60 ते 70 टक्के जमिनी विकल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शिवसेना प्रकल्पाला विरोध असल्याचे दाखवत असले तरी प्रकल्प आणण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारीच प्रयत्नशील आहेत. प्रकल्प आणू पाहणारी समिती सातत्याने मुख्यमंत्री कार्यालयाच्या संपर्कात असल्याचेसुद्धा त्यांनी म्हटले आहे. एमआयडीसीमध्येही व्यवहार रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामधील बारसू येथे एमआयडीसी येणार असून त्याठिकाणीसुद्धा शिवसैनिकांनी जमिनींचे व्यवहार केले आहेत. शेतकर्यांची फसवणूक होत असून बंद सातबार्यांचा व्यवहार करणार्यांना तुरुंगात पाठविले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

 दरम्यान, नाणार प्रकल्पासाठी समर्थकांनी जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. यावेळी 8500 हजार एकर जमीनमालकांची संमती असल्याचे समर्थकांनी म्हटले आहे. तसेच नाणार प्रकल्पात झालेल्या जमीन खरेदी व्यवहाराची चौकशीची मागणी प्रकल्प विरोधकांचे नेते अशोक वालम यांनी केली आहे.