सर्व सेवा संघाच्या अध्यक्षांची केली उचलबांगडी

September 24,2020

वर्धा : २४ सप्टेंबर - महात्मा गांधींचा विचारावर चालणार्या आणि महात्मा गांधींचे विचार जोपासण्यासाठी प्रचार व प्रसार करणार्या सेवाग्राम येथील सर्व सेवा संघाच्या कार्यसमितीच्या आभासी सभेत सर्व सेवा संघाचे कार्याकारी अध्यक्ष महादेव विद्रोही यांची सर्वानुमते उचलबांगडी करण्यात आली. महात्मा गांधी यांच्या सार्थशतीनिमित्त देशात गांधीविचारक कार्यक्रमांचे नियोजन करीत असतानाच हा वाद चव्हाट्यावर आला आहे. नवीन अध्यक्षाची निवड होईस्तोवर चंदनपाल यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

सर्व सेवा संघात गेल्या अनेक दिवसांपासुन राजीनाराजी सुरू असल्याने आज 23 रोजी सर्व सेवा संघाच्या विश्वस्तांची आभासी बैठक घेण्यात आली. यात कार्य समितीचे सदस्य, सर्व सेवा संघाचे माजी अध्यक्ष, प्रबंधक विश्वस्त तसेच सदस्य, सेवाग्राम आश्रमचे अध्यक्ष तसेच निवडणूक अधिकारी याच्यांसह 30 जणांनी सहभाग घेतला होता. कार्य समितीच्या वरिष्ठ सदस्य आशा बोधरा यांनी महादेव विद्रोही यांना 31 मार्चला त्याचा कार्यकाळ संपल्यानंतरही असंविधानिक पद्धतीने केलेल्या कामाची चर्चा करताना विद्रोही यांनी कार्यालय मंत्री, महामंत्री तसेच अन्य दोन मंत्र्यांची नियुक्ती केली. सोबतच सुरूवातीचे महामंत्री चंदन पाल, सेवाग्राम आश्रमचे अध्यक्ष टीआरएन प्रभू, विश्वस्त आशा बोथरा आदींना पदावरुन काढण्या बरोबरच अनेक अवैध काम केल्याचे सांगितले तर तेलंगना सर्वोदय मंडळाचे माजी अध्यक्ष जी. व्ही. एस. प्रसाद यांनी या तेलंगाणा येथील चौकशीची मागणी केली. महादेव विद्रोही यांचे असंविधानीक काम, वरिष्ठ लोकसेवक, निवडणूक अधिकारी तसेच सर्व सेवा संघाच्या विश्वस्थांसोबत केलेल्या व्यवहारावर सर्वानी टीका केली असुन या सर्वाच्या सहमतीने महादेव विद्रोही यांची सर्वसेवा संघाच्या कार्यकारीअध्यक्ष पदावरुन उचलबांगडी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच्या जागेवर चंद्रपाल यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष शिवचरण ठाकूर यांनी सर्व सेवा संघाचे वेगळे अधिवेशन घेण्याचे आवाहन केले आहे. काही महिन्यांपुर्वी सेवाग्राम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी आर एन प्रभु यांना महादेव विद्रोही यांना पदावरुन हटवले होते तेव्हापासुनच हा वाद चव्हाट्यावर आला आहे.