गुप्तेश्वर पांडेंच्या संभाव्य राजकारण प्रवेशावर काँग्रेस आणि शिवसेनेचे टीकास्त्र

September 24,2020

पाटणा : २४ सप्टेंबर -  सध्या बिहार विधानसभेच्या सुरु असलेल्या निवडणुकीच्या धामधुमीत बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. यामुळे ते चर्चेत आले असून काँग्रेस आणि शिवसेनेनं त्यांच्यावर निवडणुकीसाठीच त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसने केलेला हा हा आरोप आता खरा ठरत असल्याचे खुद्द पांडे यांनी केलेल्या एका विधानातून स्पष्ट होत आहे.

गुप्तेश्वर पांडे म्हणाले, “राजीनामा दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर लोक माझी भेट घेत आहेत आणि मी राजकारणात येण्याचा विचार करीत असेल तर त्यांच्या जिल्ह्यातून निवडणूक लढण्याची ऑफरही देत आहेत. यातील प्रत्येकजण माझ्या खूपच जवळचा आहे. मात्र, मी राजकारणात यावं की नाही याचा निर्णय जनतेने घ्यायचा आहे. जर त्यांना वाटत असेल की मी राजकारणात यावं तर मी यासाठी तयार आहे.” एएनआयने याबाबत पांडे यांचं म्हणणं ट्विट केलं आहे.

आयपीएस अधिकारी असलेल्या गुप्तेश्वर पांडे यांनी सोमवारी ऐच्छिक सेवानिवृत्ती घोषित केली. त्यानंतर २४ तासांत त्यांच्या निवृत्तीचा निर्णय बिहार सरकारनं स्विकारला. त्यांचा कार्यकाळ संपण्यास अवघे पाचच महिने शिल्लक असताना त्यांनी सेवानिवृत्ती स्विकारली. त्यांच्या या निर्णयापासून पांडे आता राजकारणात येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. काँग्रेसने यावरुन भाजपावर निशाणा साधला असून सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात महाराष्ट्रावर आरोप करण्यासाठी भाजपाने पांडे यांचा वापर केला त्यानंतर आता त्यांना त्याची बक्षिसी देखील दिली, अशा शब्दांत काँग्रेसने भाजापवर निशाणा साधला.