भंडाऱ्यात सुरु होणार कोव्हीड तपासणी प्रयोगशाळा

September 24,2020

भंडारा : २४ सप्टेंबर - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता भंडारा येथे कोविड-19 स्वॅब तपासणी प्रयोगशाळा (आरटीपीसीआर लॅब) सुरू करण्यास मंजूरी देण्यात येत असून आठ दिवसांच्या आत प्रयोगशाळा कार्यान्वीत करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनी प्रशासनाला दिले. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सपोर्ट बेड या सूविधा अद्ययावत करण्यासोबतच पॉझिटीव्ह रूग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व तपासण्या वाढविण्याच्या सुचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या. स्वॅब तपासणी प्रयोगशाळा भंडारा येथे होणार असल्यामुळे तपासणी अहवाल तात्काळ उपलब्ध होणार आहे. यामुळे पॉझिटीव्ह रूग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे.

जिल्हा सामान्या रूग्णालय भंडारा येथील सुविधांची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. गृहमंत्री अनिल देशमुख, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार राजु कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत जाधव, आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. माधुरी माथुरकर, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी मंत्री नाना पंचबुधे, धनंजय दलाल व अधिकारी यावेळी उपस्थित होते.