नरभक्षक वाघीण अखेर जेरबंद, नागपुरात आणणार

September 24,2020

नागपूर : २४ सप्टेंबर - यवतमाळमधील केळापूर तालुक्यातील पाटणबोरी परिसरात मानवी वस्तीत वावर वाढलेल्या ‘टी-टी२सी१’ या नरभक्षक वाघिणीस वन विभागाच्या विशेष बचाव पथकाने  बुधवारी अखेर अंधारवाडी परिसरात जेरबंद केले. या वाघिणीने गेल्या दोन महिन्यांपासून अंधारवाडी, कोबई ,कोपामांडवी, सुनकडी, वासरी, वाऱ्हा या गावांमध्ये दहशत पसरविली होती. वनविभागाच्या मदतीने अमरावती येथील ‘रॅपीड रेस्क्यू टीम’ने आज (बुधवार) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास वाघिणीस बेशुद्ध करून ताब्यात घेतले. यानंतर तिची रवानगी नागपूरच्या गोरेवाडा प्राणी बचाव केंद्रात करण्यात आली आहे.

आतापर्यंत या वाघिणीने परिसरातील अनेकांच्या जनावरांवर हल्ला करून त्यांना ठार केले होते. १९ सप्टेंबरला तालुक्यातील अंधारवाडी येथील लक्ष्मीबाई भीमराव दडांजे या महिलेवर हल्ला करून ठार केले होते. त्यापूर्वी ४ सप्टेंबर रोजी सुभाष कायतवार हा युवक या वाघिणीच्या हल्ल्यात गंभीर झाला होता. तेव्हापासून या वाघिणीस जेरबंद करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या सूचनेनुसार मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धतीनुसार समितीची एक बैठकही पार पडली होती. त्याप्रमाणे पांढरकवडा वन विभागाने पथकांनी पथकं तयार करून वाघिणीचा शोध सुरु केला होता. यासाठी परिसरात २९ कॅमेरे देखील लावण्यात आले होते. वन्यजीव रक्षक डॉ.रमजान विराणी यांनी सादर केलेल्या कॅमेरा फुटेजमध्ये तसेच इतर कॅमेऱ्यात आलेल्या चित्रीकरणात या वाघिणीचा वावर दिसला. ही वाघीण ‘टी-टी२सी१’ असल्याचे लक्षात आले. या सर्व हल्ल्यांमध्ये हीच वाघीण कॅमेरा चित्रीकरणात आढळली.

नागरिकांचा असंतोष बघता अमरावती येथील विशेष पथक चार दिवसांपासून बोरी, अंधारवाडीच्या जंगलात या वाघिणीवर नजर ठेवून होती. या वाघिणीस पकडण्याचा आदेश राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी मंगळवारी दिले. त्यानंतर वाघिणीस पकडण्याच्या हालचाली तीव्र झाल्या. आज बुधवारी सकाळी ही वाघीण अंधारवाडी परिसरात जंगलात फिरताना आढळली. वनविभागाच्या पथकाने शिताफिने तिला ‘ट्रँग्यूलाईज’ करून बेशुद्ध केले. ही माहिती परिसरात मिळताच नागरिकांनी वाघिणीला जेरबंद करण्यात आलेल्या ठिकाणाकडे धाव घेतली व जल्लोष केला.