फुलपाखरांच्या महागणनेत विविध प्रजातीची वैविद्यपूर्ण फुलपाखरे आली आढळून

September 24,2020

वर्धा : २४ सप्टेंबर - १४ ते २० सप्टेंबर या कालावधीत वर्धा येथे आयोजित फुलपाखरांच्या महागणनेत विविध प्रजातीची वैविद्यपूर्ण फुलपाखरे आढळून आली आहेत.  सप्टेंबर हा फुलपाखरांचा महिना म्हणून देशभरात साजरा केला जातो. या अंतर्गत ठिकठिकाणी पाखरांची गणना झाली. बहार नेचर फाउंडेशन व विद्याभारती महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या उपक्रमात सेवाग्राम रेल्वेस्थानक ते चितोडा रोड दरम्यान असलेल्या अधिवासात गणना झाली.

या परिसरात चांदवा, बहुरूपी, चट्टेरी भटक्या, कवडश्या, अविस्मरणीय, तृणपिलाती, नील भिरभिरी, नीलय, कवडा, लघु तृणपिलाती, पट्टेरी रूईकर, सांजपरी अशी विविध प्रकारची फुलपाखरे अभ्यासकांना आढळून आली. प्रत्येक फुलपाखरू एका किंवा विशिष्ट वनस्पतीवरच अंडी घालतात. या वनस्पती अंड्यातून बाहेर पडणाºया सुरवंटाच्या खाद्य वनस्पती असतात. त्याला ‘होस्ट प्लांट’ म्हटल्या जाते. त्यामूळे एखाद्या अधिवासात जेवढ्या जास्तीतजास्त प्रकारच्या खाद्य वनस्पती असतील, तितक्या अधिक प्रमाणात फुलपाखरांचे वैविद्य दिसून येते. त्याचे भान ठेवून गणनेदरम्यान होस्टपान असलेले रोपटे लावून निसर्गप्रेमींनी फुलपाखरोत्सव साजरा केला.

जिल्ह्यात आढळणाऱ्या पक्ष्यांची सूची बहारने यापूर्वी प्रकाशीत केली आहे. फुलपाखरांच्या सखोल व अभ्यासपूर्ण नोंदी घेवून या पूढे फुलपाखरांची सूची तयार केली जाणार आहे. वर्षभराच्या निरिक्षणाअंती ही सूची प्रकाशीत केल्या जाणार आहे. बहारचे अभ्यासक प्रा. किशोर वानखेडे, दिलीप विरखेडे, जयंत सबाने, वैभव देशमुख, दर्शन दुधाणे यांचा गणनेत सहभाग होता. फुलपाखरांच्या रंगेबिरंगी दुनियेसोबतच त्यांची माहिती व महत्व सर्वापर्यत पोहोचविण्याच्या उद्देशाने वर्धा शहरालगत फुलपाखरू उद्यानाची निर्मिती करण्याचा बहारचा मानस आहे. उद्यानास पोषक अधिवासाचा शोध घेवून उद्यान निर्मितीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केल्या जाणार असल्याचे संजय इंगळे तिगावकर यांनी सांगितले.

या उत्सवाअंतर्गत आयोजिन्यात आलेल्या वेबसंवादात मुंबईचे प्रसिध्द किटकतज्ञ डॉ. अमोल पटवर्धन यांनी फुलपाखरांच्या जीवनावर भाष्य केले. एकेक झाड हे पाखरांचे अभयारण्य असते. आधी दिसायची ती फुलपाखरे आता दिसत नाही, असे आपण म्हणतो, याचा अर्थ फुलपाखरांची झाडे आपण नष्ट केली. प्रत्येक जातीच्या फुलपाखरांची ठराविक झाडे असतात. त्यामूळे झाडांचे पर्यावरणातील महत्व अधोरेखीत होते. फुलपाखरांची शरिररचना, प्रकार, फुलपाखरांचे अधिवास, निसर्गातील कार्य याविषयी डॉ. पटवर्धन यांनी सविस्तर मांडणी केली. डॉ. बाबाजी घेवडे व दिलीप विरखेडे यांनी या संवादाचे सूत्र सांभाळले.