पोलिसांनी नष्ट केला १७ क्विंटल मोहसडवा

September 24,2020

गडचिरोली : २४ सप्टेंबर - गडचिरोली तालुक्यातील भगवानपूर-मोहडोंगरी जंगलपरिसरात दारूविक्रेत्यानी मोहसडवा टाकला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गडचिरोली पोलिस व मुक्तिपथ चमुनी शोधमोहीम राबवून ९0 हजार रुपये किमतीचा १७ क्विंटल मोहसडवा व साहित्य नष्ट केले. या कारवाईमुळे दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

मोहडोंगरी येथे मोठय़ा प्रमाणात अवैध दारूविक्री केल्या जाते. सभोवतालच्या गावांतील मद्यपी मोहडोंगरी येथे जाऊन दारू पितात. त्यामुळे महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अखेर बामणी येथील गाव संघटनेने पुढाकार घेत दारूविक्रेत्यांना धडा शिकविण्याचे ठरविले. भगवानपूर-मोहडोंगरी जंगल परिसरात अनेक दारूविक्रेत्यानी मोहसडवा टाकला असल्याची माहिती गावसंघटनेद्वारा मुक्तिपथ तालुका चमू व पोलीस ठाण्याला देण्यात आली. त्यानुसार गडचिरोली पोलिसांनी जंगलपरिसरात शोधमोहीम राबविली. दरम्यान काही ठिकाणी मोहसडवा टाकला असल्याचे दिसून आले. पोलिसांनी असा एकूण ९0 हजार रूपये किंमतीचा जवळपास १७ क्विंटल मोहसडवा व साहित्य नष्ट केला आहे. पोलिसांच्या या कृतीमुळे परिसरातील दारूविक्रेत्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सदर कारवाई पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय पूनम गोरे, पीएसआय स्नेहल चव्हाण, बिट जमादार भाष्कर ठाकरे, प्रमोद वाळके, मुक्तिपथ तालुका चमू यांनी केली.