आदिवासी युवकांना वनकर्मचार्यांनी केली मारहाण

September 24,2020

वाशीम : २४ सप्टेंबर - काळाकामठा येथील आदिवासी युवकांना वनविभागाच्या कर्मच्यार्यांनी मारहाण केल्याची घटना सोमवार, २१ सप्टेंबरच्या रात्री घडली. हे युवक मेडशी जवळील नदीमध्ये खेकडे पकडण्यासाठी गेले होते. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

याबाबत काळाकामठा येथील अनिल महादेव शिंदे यांनी मालेगाव पोलिसात फिर्याद दिली की २१ सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजताच्या दरम्यान घरून त्यांचे मित्र अमोल शामराव लोखंडे व देवानंद बजरंग शिंदे यांचेसह मेडशी जवळील धरणाच्या सांडव्याखाली पुलाजवळ खेकडे पकडण्यासाठी निघाले. त्यांनी रात्री ११ वाजेपर्यंत खेकडे पकडले. घरी परत जाण्यासाठी पुलाजवळील मोटारसायकल जवळ आले. त्यावेळी वनविभागाची जिप तिथे आली. त्यांनी त्यांना काय आहे, असे विचारले असता त्यांनी खेकड्याबद्दल सांगितले. त्यावेळी त्या ड्रायव्हर ने खेकडे मागितले. युवकांनी खेकडे देण्यास नकार दिल्यावर ड्रायव्हरने मारहाण केली व मोटरसायकलची चाबी काढून घेतली. तेव्हा गाडीतून ३ कर्मचारी उतरले. त्यांनी या युवकांना थापडा बुक्क्यांनी मारहाण केली. गाडीत बसवून वनविभागाच्या डेपोत नेले तिथे त्यांनी या युवका जवळचे टॉर्च, खेकडे, जाळे मासळ्या जबरदस्तीने घेतल्या. तुम्ही लाकडी चोर आहात, असे म्हणून कर्मचारी यांनी लाकडी काठी, दंडे, राफ्टर ,बुटांच्या लाथा, थापाडाणी मारहाण केली अंगावर पेट्रोल टाकून पुन्हा मारहाण केली. जातिवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी ८ जणांवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास मालेगाव पोलिस करीत आहेत.