रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगाडी यांचे निधन

September 24,2020

नवी दिल्ली : २४ सप्टेंबर - रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगाडी यांचे बुधवारी रात्री कोरोनामुळे निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. संसदेचे पावसाळी अधिवेशन संपून काही तास उलटत नाही, तोच अंगाडी यांचा कोरोनाने बळी घेतला. गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे 11 सप्टेंबरला अंगाडी यांना कोरोनाची लागण झाली होती, उपचारासाठी त्यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले होते. याआधी पण कोरोनाने दोन खासदारांचा मृत्यू झाला आहे.

 काही तास आधीच अंगाडी यांनी भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे एक ट्टिव रिट्विट केले होते. अंगाडी कर्नाटकातून लोकसभेवर निवडून आले होते. याआधी कर्नाटकातील राज्यसभा सदस्य अशोक गस्ती यांचे निधन झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरेश अंगाडी यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले.