पृथ्वी - २ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

September 24,2020

बालासोर : २४ सप्टेंबर - संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘पृथ्वी-2’ क्षेपणास्त्राची  बुधवारी रात्री ओडिशाच्या बालासोर येथील चांदीपूर केंद्रातून यशस्वी चाचणी घेण्यात आली. रात्रीच्या वेळीही हे क्षेपणास्त्र किती परिणामकारक मारा करू शकते, यासाठी ही चाचणी घेण्यात आली.

 जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास परिषदेने विकसित केले आहे. खास लष्करासाठी करण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राने चाचणीतील सर्वच निकष पूर्ण केले आहेत, अशी माहिती संरक्षण सूत्रांनी दिली.

 या क्षेपणास्त्राची मारकक्षमता 350 किलोमीटरची असून, मोबाईल लॉन्चरच्या सहाय्याने ही चाचणी घेण्यात आली. ही एक नियमित चाचणी होती. यासाठी सरसकट पद्धतीचा वापर करून क्षेत्रणास्त्राची निवड करण्यात आली होती. चाचणीच्या काळात इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टिमद्वारे या क्षेपणास्त्रावर नजर ठेवण्यात आली होती, असे डीआरडीओच्या अधिकार्याने सांगितले.

चाचणीच्या काळात या क्षेपणास्त्रासाठी बंगालच्या समुद्रात लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. या लक्ष्याचा क्षेपणास्त्राने अचूक वेध घेतला, असे अधिकारी म्हणाला. यापूर्वी या क्षेपणास्त्राची रात्रीची चाचणी गेल्या वर्षी 20 नोव्हेंबर रोजी घेण्यात आली होती. सुमारे 500 ते एक हजार किलोगॅ्रम इतक्या वजनाची स्फोटके वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे.