राफेल विमानाच्या पहिल्या महिला वैमानिक शिवांगी सिंह

September 24,2020

नवी दिल्ली : २४ सप्टेंबर - फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह या राफेल लढाऊ विमानाचे उड्डाण करणाऱ्या पहिल्या महिला वैमानिक बनल्या आहेत. शिवांगी सिंह यांना राफेल विमानाच्या स्क्वॉड्रनची पहली महिला वैमानिक बनण्याचा मान मिळाला आहे. शिवांगी सिंह वाराणसीतील राहणाऱ्या आहेत. शिवांगी यांच्या आई सीमा सिंह यांनी, मुलीने जे स्वप्न पाहिले होते, ते पूर्ण केले असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

 शिवांगी यांची सध्याची पोस्टिंग राजस्थानमध्ये आहे. एक महिन्याच्या तांत्रिक प्रशिक्षणासाठी पात्र झाल्यानंतर त्या राफेल संघात सहभागी झाल्या आहेत. देशातील सर्वात शक्तिशाली राफेल विमान उडवण्याची जबाबदारी त्यांना मिळाली आहे. लेकीच्या या सन्मानानंतर त्यांच्या कुटुंबात उत्साहाचे वातावरण आहे. शिवाय त्याच्या कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. योगायोग म्हणेज मागील वर्षी डिसेंबरमध्ये शिवांगी नावाचीच महिला भारतीय नौदलातील पहिल्या वैमानिक बनल्या होत्या.

 शिवांगी लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असून शालेय शिक्षणानंतर त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयात शिक्षण घेतल्याचे सीमा सिंह यांनी सांगितले. शिवांगी बीएचयूमध्ये नॅशनल कॅडेट कोरमध्ये 7 एअर स्क्वाड्रनचा भाग होत्या. बीएचयूमध्ये 2013 ते 2015 पर्यंत त्या एनसीसी कॅडेट होत्या. तसेच 2013 मध्ये दिल्लीत स्वातंत्र्यदिनी परेडमध्ये त्यांनी उत्तर प्रदेश टीमचे प्रतिनिधित्व केले असल्याची माहिती, शिवांगीचे वडील कुमारेश्वर सिंह यांनी दिली.

2016 मध्ये प्रशिक्षणासाठी त्या वायू सेना अकॅडमीमध्ये सामिल झाल्या. 16 डिसेंबर 2017 रोजी त्यांना हैदराबादमधील एअर फोर्स अकॅडमीमध्ये फायटर पायलटची पदवी मिळाली. हैदराबादमध्ये ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर शिवांगी सध्या मिग-21च्या फायटर पायलट आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी राफेल उडवने तेवढे आव्हानात्मक नसेल. कारण, ताशी 340 किमीवेग असलेले मिग-21 हे जगातील दुसरे सर्वात जलद लॅण्डिंग आणि टेकऑफ स्पीड असलेले विमान आहे.

 शिवांगी सिंह कन्वर्जन ट्रेनिंग पूर्ण करताच हवाई दलाच्या अंबाला एअरबेसमधील 17 गोल्डन एरोज स्क्वॉड्रनमध्ये औपचारिक प्रवेश करतील. एखाद्या वैमानिकाला एका लढाऊ विमानातून दुसऱ्या लढाऊ विमानात स्वीच करण्यासाठी कन्वर्जन ट्रेनिंग घेण्याची आवश्यकता असते.