कुऱ्हाडीने वार करून केली पत्नीची हत्या

September 20,2020

वाशीम : २० सप्टेंबर - मालेगाव तालुक्यातील कोळगाव बु. येथे पतीने पत्नीच्या मानेवर व पाठीवर कुऱ्हाडीने  वार करून हत्या केल्याची घटना 19 सप्टेंबर रोजी घडली. याबाबत पतीच्या भावाने मालेगाव पोलिसात आज, 20 सप्टेंबर रोजी फिर्याद दिली आहे.

 कोळगाव बु. येथील मधुकर कुंडलिक मुळे यांनी मालेगाव पोलिसात फिर्याद दिली की, त्यांचा लहान भाऊ किसन कुंडलिक मुळे (वय 50) हा त्याची पत्नी सागर किसन मुळे (वय 45) मुलगा गणेश मुळे व सुन शारदा व लहान मुलगा ज्ञानेश्वर यांच्यासह राहत होते. किसन व त्याची पत्नी सागर यांच्यामध्ये नेहमी वाद होत असल्याने किसन हा घरात एकटाच वेगळा राहत होता. त्याची पत्नी सागर, मुलगा व सुनेसोबत घरातच पतीसासून वेगळी राहत होती. यावर्षी किसन 4 एकर तर त्याची पत्नी 2 एकर शेती करीत होते.

 19 सप्टेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता दरम्यान सागर ही म्हैस चारण्यासाठी शेतात घेऊन गेली. त्यावेळी त्यांच्या पाठोपाठ किसन कुर्हाजड घेऊन गेल्याचे त्यांची सुन शारदाने सांगितले. त्यांनतर त्यांना पाहण्यासाठी शेतात गेले असता म्हैस सतीश पवार यांच्या शेतात झाडाला बांधलेली होती. किसन व त्यांची पत्नी सागर यांचा शोध न लागल्याने रात्री 9.30 वाजता म्हैस घेऊन ते घरी आले. आज सकाळी 6.30 वाजता भाऊ व भावजय यांची चौकशी करण्यासाठी मधुकर मुळे घरी गेले असता दोघेही घरी आले नसल्याचे समजले त्यांनतर मधुकर मुळे शेतात शोधण्यासाठी गेले. तेथे म्हैस बांधलेल्या ठिकाणाजवळ सोयाबीनमध्ये सागरबाई पडलेली दिसली. तिच्या मानेवर व पाठीवर धारदार हत्याराच्या गंभीर जखमा होत्या. सागर मुळे हिचा खुन पती किसन कुंडलिक मुळे यांनी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी भादवी कलम 302 नुसार गुन्ह्याची नोंद केली आहे.