जनता कर्फ्यूला आजही फारसा प्रतिसाद नाही

September 20,2020

नागपूर : २० सप्टेंबर - नागपुरात २ दिवसीय जनता कर्फ्यूच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच आज नागपूरकरांनी संमिश्र प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. कालच्या सारखेच आजही काही दुकाने उघडी तर काही बंद असा प्रकार असल्याचे जाणवले. 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या प्राश्वभूमीवर नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी दोन दिवसाचा जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. मात्र, प्रशासनाचे फारसे सहकार्य नसल्याने हा कर्फ्यू यशस्वी झाला नाही. आज दुसऱ्या दिवशीही नागरिक लक्षणीय संख्येत घराबाहेर पडल्याचे दिसून आले. बरीचशी दुकाने उघडी होती. आणि ग्राहकही दुकानांमध्ये गर्दी करीत होते. विशेषतः पोलीस खात्याने कुणी दुकान बंद करण्याची जबरदस्ती केल्यास त्वरित कळवावे असे आवाहन केल्यामुळे दुकानदारांनी निर्धास्तपणे दुकाने उघडली. 

जाणकार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महापौर संदीप जोशी यांनी फारसे कुणाला विश्वासात न घेता हा एकतर्फी निर्णय घेतला होता. त्यामुळे विरोधी पक्ष तर जाऊ द्या पण स्वपक्षीयांचाही त्यांना फारसा पाठिंबा मिळाला नाही.