नागपुरात कोव्हीशील्ड ची चाचणी होणार

September 20,2020

नागपूर : २० सप्टेंबर - नागपुरातील मेडिकल रुग्णालयात लवकरच ऑक्सफर्ड विद्यापीठात विकसित होत असलेल्या कोव्हिशील्ड या कोरोना लसीची मानवी चाचणी केली जाणार आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, अँलस्टेजनेका व पुण्यातील सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही लस तयार होत आहे. तिची चाचणी देशभरातील १७ ठिकाणांसह नागपुरातील मेडिकल रुग्णालयातही होईल. मेडिकलमध्ये पहिल्या चरणात १०० व्यक्तींवर ही चाचणी केली जाईल. त्यासाठी इच्छुकांची नोंदणी येत्या आठवड्यात सुरू होणार आहे. एकीककडे पूर्णतः भारतात तयार होत असलेल्या 'कोव्हॅक्सिन' लसीची मानवी चाचणी नागपुरात सुरू असून तिचा दुसरा टप्पा आटोपला आहे.

 मात्र, कोविशिल्ड लसीची अंतिम टप्प्यातील चाचणी २२ ऑगस्टपासून सुरूही झाली आहे. ती भारतातील १७ ठिकाणी एकूण १६०० रुग्णांवर केली जाईल. प्रत्येक ठिकाणी १०० रुग्णांवर ती केली जाईल. १८ ते ६० वर्षे वयोगटातील निरोगी व्यक्तींची यासाठी निवड केली जाईल. पहिली मात्र दिल्यानंतर २८ दिवसांनी दुसरी मात्र दिली जाईल. ५६ व्या दिवशी त्यांची रुग्णालयात वैद्यकीय तपासणी होईल. ९० व्या दिवशी दूरध्वनीवरून चौकशी तसेच १८० व्या दिवशी पुन्हा रुग्णालयात तपासणी केली जाईल. या दरम्यान त्यांना गरज भासल्यास आवश्यक ती वैद्यकीय मदत केली जाईल. नागपुरात या लसीची सुरक्षितता व रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याची क्षमता तपासली जाणार असल्याचे प्रमुख अन्वेषक डॉ. सुशांत मेश्राम यांनी सांगितले. चाचणी सहा महिनेतरी चालेल. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, भौतिकोपचार तज्ज्ञ डॉ. शिल्पा गुप्ता, डॉ. सुशांत मुळे, डॉ. रवि यादव, डॉ. अलिना अलेक्झांडर हे या चाचणीचे सहअन्वेषक आहेत. सध्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांचेही यात सहकार्य मिळत आहे.