भाजप आमदाराने सुरक्षा नियम तुडवले पायदळी

September 20,2020

गांधीनगर : २० सप्टेंबर - करोनावर मात केलेल्या भाजपा आमदाराने सुरक्षेचे नियम पायदळी तु़डवत मंदिरात डान्स केल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गुजरातमध्ये हा प्रकार घडला असून मधू श्रीवास्तव असं या आमदाराचं नाव आहे. मधू श्रीवास्तव आपल्या वादग्रस्त विधानं आणि कृत्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. नुकतंच मधू श्रीवास्तव यांनी करोनावर मात केली आहे. मात्र अशा परिस्थितीतही वडोदरा येथील मंदिरात आपल्या समर्थकांसोबत सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन करताना दिसून आले.

मधू श्रीवास्तव यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये व्हिडीओत मधू श्रीवास्तव भजन सुरु असताना नाचत असल्याचं दिसत आहे. यावेळी त्यांचे समर्थक त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करतानाही दिसत आहेत. व्हिडीओ वाद्य वाजवणारे दोन व्यक्ती वगळता कोणीही मास्क घातलेला दिसत नाही. मंदिराच्या पुजाऱ्यानेही मास्क परिधान केलेला नव्हता.

मधू श्रीवास्तव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी म्हटलं की, “मी मंदिरात नाचत असतानाचा व्हिडीओ खरा आहे. मी प्रत्येक शनिवारी हे करतो. गेल्या ४५ वर्षांपासून मी मंदिरात जात आहे. यात काहीही नवीन नाही. सरकारने एकत्रित येण्यासाठी परवानगी दिलेली असून मी कोणत्याही नियमाचं उल्लंघन केलेलं नाही. तिथे काही मोजके लोक होते आणि हा खासगी कार्यक्रम होता”.

मधू श्रीवास्तव यांनी मंदिर आपल्या मालकीचं असून तिथे प्रवेश कऱणाऱ्यांना मास्क घालणं अनिवार्य नसल्याची माहिती दिली आहे. वरिष्ठ भाजपा नेत्यांनी मात्र यावर कोणतंही भाष्य करण्यास नकार दिला आहे.