शेतकरी विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने

September 20,2020

नवी दिल्ली : २० सप्टेंबर - संसदेत कृषी विधेयक मंजूर झाल्यानंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्र सरकार विरुद्ध संधीच्या शोधात असलेल्या काँग्रेसला यामुळे नवा मुद्दा मिळाला असून राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकारने मनमानी करत शेतकऱ्यांची जमीन आणि पाणी त्यांच्यापासून हिसकावून घेतलं आहे असा आरोप काँग्रेसने केला आहे.

शेतकऱ्यांना सरकारने बड्या उद्योगपतींच्या हवाली केलं असा आरोपही काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात आणलेलं विधेयक हे घोडा होतं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेलं विधेयक हे गाढव आहे अशी टीका काँग्रेसचे खासदार आणि नेते अहमद पटेल यांनी केली आहे.

तर विधेयक हे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहे. किमान आधारभूत किंमत आणि सरकारी खरेदी बंद होणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सांगितलं आहे. शेतकऱ्यांसाठी हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी दिवस असल्याचंही ते म्हणाले.

काँग्रेस ने मोदी सरकार  च्या तीव्र आंदोलन पुकारले आहे. हरियाणा आणि पंजाबमध्ये जोरदार आंदोलन सुरू झाले आहे.

अंबाला येथील सदोपूर बॉर्डरवर यूथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पाण्याचा फवारा मारला.