हिवाळी अधिवेशनावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये वादावादी

September 20,2020

नागपूर : २० सप्टेंबर - मुंबईचे औटघटकेचे अधिवेशन कोरोना संकटात संपले. आता नागपूरला होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचे वेध लागलेले आहेत. कोरोनाचा वाढत संसर्ग लक्षात घेता या अधिवेशनाचा कालावधी किती राहणार, याविषयी साशंकता असली तरी तूर्तास काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांमध्ये यावरून जुंपली आहे. 

नागपूर करारानुसार नागपुरात दरवर्षी होणारे हिवाळी अधिवेशन रद्द करा, याऐवजी नागपुरातील कोरोना संकटावर लक्ष केंद्रित करा, पैसे खर्च करा अशी मागणी शहर काँग्रेस अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. सरकारने या मागणीची दखल घेण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस कडून या मागणीला विरोध पुढे आल्याने महाआघाडीतील सारेकाही ऑलवेल नसल्याचे उघड झाले. 

विदर्भातील प्रलंबित प्रश्नांसाठी हिवाळी अधिवेशन व्हायलाच हवे, अशी मागणी शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अनिल अहिरकर यांनी केली आहे. नागपुरात अधिवेशनाच्या निमित्ताने सरकार येते. अनेक प्रश्न मार्गी लागतात. विदर्भात अनेक प्रस्न प्रलंबित आहेत. शेतकरी, रोजगार, शिक्षण, आरोग्यविषयक प्रश्न आज महत्वाचे आहेत. कोव्हीड संकटामुळे मुंबईला आपल्या मागण्यांसाठी जाणे शक्य नाही. भाजपच्या काळात मनपातील अनागोंदी, कोव्हिडचा वाढत प्रादुर्भाव, हॉस्पिटलच्या माध्यमातून होणारी लूट या सर्व मुद्द्यांवर अधिवेशनातूनच न्याय मिळू शकतो असा विश्वास अहिरकर यांनी व्यक्त केला आहे. 

एकंदरीत राज्यात सत्तेत एकत्रित असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा वेगळा सूर यानिमित्ताने पुढे आल्याने कार्यकर्त्यांमध्ये मनपा निवडणुकीपूर्वीच संभ्रमाचे वातावरण आहे. दुसरीकडे सरकारच्या अस्थिरतेच्या वातावरणातही शिवसेना स्वबळावर निवडणुकीच्या तयारीला लागली आहे.