मेगा पोलीस भरतीत ७५ टक्के जागा विदर्भाला द्या - राम नेवले

September 20,2020

नागपूर : २० सप्टेंबर -  राज्यात लवकरच १२ हजार ५२८ पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. या मेगा भरतीमध्ये ७५ टक्के पदे विदर्भातील तरुणांना द्या व नागपूर करारात नमूद केलेल्या टक्केवारी नुसार विदर्भात जागा भरल्या गेल्या नसल्यामुळे निर्माण झालेला  बॅकलॉग भरून विदर्भातील बेरोजगारांवरील अन्याय कमी करा, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी केली आहे. 

२८ सप्टेंबर १९५३ रोजी नागपूर करार करून विदर्भाला जबरदस्तीने महाराष्ट्रात सामील केले. त्या करारानुसार महाराष्ट्र राज्यात ज्या सरकारी नोकऱ्या निघतील त्यात विदर्भातील लोकसंख्येच्या मानाने २३ टक्के नोकऱ्या विदर्भातील तरुणांना देण्यात येतील. हे पहिलेच कलम आहे. तसेच उच्च पदाच्या नोकऱ्यांमध्ये २३ टक्के विदर्भातील तरुणांना देण्याचे मान्य केले आहे. परंतु फक्त ८ टक्केच विदर्भाला नोकऱ्या दिल्या. विदर्भातील तरुणांच्या हक्काच्या ३ लाखापेक्षा जास्त नोकऱ्या पश्चिम महाराष्ट्रानं पळविल्या. म्हणून आता या पोलीस मेगा भरतीमध्ये ७५ टक्के पदे विदर्भातील तरुणांना देण्यात यावे. अन्यथा विदर्भातील तरुण रस्त्यावर येतील, असा इशाराही समितीने दिला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे विदर्भातील आहेत. त्यांनी पोलीस भरतीत विदर्भातील ७५ टक्के तरुणांना सामावून घेत विदर्भाला न्याय द्यावा, अशी मागणीही समितीने केली आहे. नागपूरच्या करारानुसार विदर्भाला महाराष्ट्रात सामील तर करून घेतले परंतु त्या करारानुसार विदर्भाला जो  २३ टक्के   वाटा प्रत्येक क्षेत्रात देणे लागत होते, त्यापैकी एकही कलम पुढे पाळल्या गेले नाही. असा आरोप नेवले यांनी केला.