पश्चिम बंगाल अवैध बॉम्बनिर्मितीचे केंद्र - राज्यपालांची टीका

September 20,2020

कोलकाता : २० सप्टेंबर - एनआयएने अल् कायदाच्या सहा अतिरेक्यांना अटक करून, त्यांच्याजवळून बॉम्ब आणि आयईडी तयार करण्याचे मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त केल्यानंतर, राज्यपाल जगदीप धनकड यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. पश्चिम बंगाल संघटित अतिरेकी गटांच्या कारवायांसाठी अतिशय पोषक राज्य बनले असून, अवैध बॉम्बनिर्मितीचे केंद्रही ठरले आहे, अशी टीका धनगड यांनी  केली.

भारतीय लोकशाही अस्थिर करण्यासाठी अतिरेकी गट पश्चिम बंगालचा वापर जास्त करीत आहेत, कारण या राज्यात कायदा व सुव्यवस्था अस्तित्वात नाही, याची माहिती त्यांना आहे. कायद्याचे राज्य निर्माण करण्यात मुख्यमंत्री बॅनर्जी पूर्णपणे अपयशी ठरल्या आहेत. त्या अजूनही राजकीय फायदा कसा मिळेल, अशाच गोष्टींमध्ये रमल्या आहेत. मोदी सरकारवर टीका करण्यातच त्यांना आनंद वाटत आहे. ही कारवाई राज्य पोलिसांनी केली असती, तर पोलिस सतर्क असल्याचे सांगण्याची गरज पडली नसती, पण एनआयएने ही कारवाई केली आहे, असा चिमटाही धनगड यांनी काढला.

 राज्याचे पोलिस महासंचालक कायदा व सुव्यवस्थेतील अपयशाच्या जबाबदारीतून स्वत:ला दूर करू शकत नाही. अलिकडील काळात त्यांचा व्यवहार पाहू जाता, राज्यातील पोलिसांच्या एकूण स्वभावाची प्रचिती येते, असेही त्यांनी ट्विटरवर नमूद केले.