जम्मूत लष्कर- ए - तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना लष्कराने केली अटक

September 20,2020

श्रीनगर : २० सप्टेंबर - जम्मूमधील राजौरी जिल्ह्यातून पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना पकडण्यात, जवानांच्या संयुक्त पथकास यश आले आहे. या दहशतवाद्यांकडून रोख रक्कमेसह मोठ्याप्रमाणावर दारूगोळा व शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे.

दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या अभियानादरम्यान या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरचे आयजीपी मुकेश सिंह यांनी सांगितले की, या दहशतवाद्यांकडून दोन एके-56 रायफल, दोन पिस्तुलं, चार ग्रेनेड व एक लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेले दहशतवादी हे दक्षिण काश्मीर येथील असून ते १९ ते २५ या वयोगटातील आहेत.

दुसरीकडे राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (एनआयए) देखील आज सकाळी पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये छापे टाकत मोठी कारवाई केली. एनआयएनं पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि केरळमधील एर्नाकुलम येथील अनेक ठिकाणांवर छापे टाकले. यादरम्यान दहशतवादी संघटना अल कायदाशी निगडीत असलेल्या ९ दहशतवाद्यांना अटक करण्यात आले आहे. एनआयएनं पश्चिम बंगालमधून सहा, तर केरळमधून तीन जणांना अटक केली आहे.