वादग्रस्त शेती विधेयकावरून राज्यसभेत गोंधळ, गोंधळातच विधेयक पारित

September 20,2020

नवी दिल्ली : २० सप्टेंबर - राज्यसभेत वादग्रस्त शेती विधेयकावरून जोरदार गदारोळ पाहण्यास मिळाला. राज्यसभेत कृषी मत्री नरेंद्र तोमर हे बोलायला उभे राहिले असता विरोधकांनी एकच गोंधळ घातला. सभापतींसमोर माईक तोडण्याचाही प्रयत्न झाला.दरम्यान आवाजी मतदानाने हे विधेयक राज्यसभेतही पारित करण्यात आले. 

वादग्रस्त ठरलेले शेती विधेयक राज्यसभेत आज मांडण्यात आले. पण अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला.

राज्यसभेत सभागृहाची वेळ वाढविण्याच्या मुद्यावरून एकच वाद पेटला.  कृषी मंत्र्यांनी उद्या उत्तर देण्याची विरोधी पक्ष नेते गुलाम नवी आझाद यांनी मागणी केली. पण या गोंधळात कृषी मंत्री नरेंद्र तोमर देत आहे चर्चेला उत्तर देत होते.

त्यामुळे संतापलेल्या विरोधकांनी राज्यसभेच्या सभापतींसमोरील माईकच तोडून नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

दरम्यान, राज्यसभेतील संख्याबळ पाहता भाजपने सर्व खासदारांसाठी व्हीप काढला असल्यामुळे  सर्व खासदार सभागृहात हजर होते. 

लोकसभेमध्ये शेतकरी विधेयक मांडण्यात आले होते. हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. परंतु, राज्यसभेत भाजपकडे पुरेस बहुमत नसल्यामुळे संख्याबळाची जमवाजमव करावी लागणार होती. राज्यसभेत अकाली दलाचे तीन सदस्य असून ते विधेयकाच्या विरोधात मतदान करतील हे निश्चित होते. 

केंद्रीय कृषिमंत्र्यांनी घाईघाईने दोन विधेयके आणली व ‘शेतकऱ्यांच्या घरातून आता सोन्याचा धूर निघेल’ अशा थाटात ती संसदेत सादर केली तेव्हा स्फोट झाला. त्यामुळे अकाली दलाच्या केंद्रातील मंत्री हरसिमरत कौर यांनी  राजीनामा दिला.  हरसिमरत कौर या मंत्रिमंडळातील अकाली दलाच्या प्रतिनिधी आहेत. 

यावेळी गोंधळ घालत विरोधी सदस्य अध्यक्षांच्या आसनासमोर धावले आणि त्यांचा  माईक हिसकण्याचा प्रयत्न केला. विधेयकाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु असतानाच आवाजी मतदानाने विधेयक पारित झाल्याचे घोषित करण्यात आले.