संसदेचे अधिवेशन लवकरच गुंडाळण्याची शक्यता

September 20,2020

नवी दिल्ली: २० सप्टेंबर - संसदेचे पावसाळी अधिवेशन ऑक्टोबरपूर्वीच गुंडाळण्याचा विचार सुरू आहे. लोकसभेचे सभापती प्रमुख असलेल्या बीएसीची बैठक झाली. या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. संसद अधिवेशनाच्या कालावधीबाबत सरकार आणि विरोधी पक्षात ही चर्चा झाली. बीएसीच्या बैठकीत संसदेचं पावसाळी अधिवेशन लवकरच संपवण्याबाबत सत्ताधारी आणि विरोधी पक्षात एकमत झाल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येतंय. संसद अधिवेशन सुरू झाल्यापासून आतापर्यंत दोन मंत्री आणि भाजपचा एक खासदार करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे संसेदचं पावसाळी अधिवेशन नियोजित वेळेपूर्वी संपवण्यावर विचार केला जात आहे. पुढील आठवड्यात बुधवारी किंवा गुरुवारी संसदेचं पावसाळी अधिवेशन संपू शकतं.

संसदेचं पावसाळी अधिवेशन पुढच्या आठवड्यात बुधवारी किंवा गुरुवारी संपू शकतं. भाजप खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी राज्यसभेत भाषण केलं. नंतर करोना चाचणीत ते पॉझिटिव्ह आढळून आले. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी केलेल्या तपासणीत त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्याचप्रमाणे नितीन गडकरी आणि प्रह्लाद पटेल यांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी ट्विट केलं. आपल्याला करोनाचा संसर्ग झाल्याचं त्यांनी ट्विटमधून सांगितलं. गडकरींच्या आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि खासदारांना करोनाचा संसर्ग झाला होता. त्यातून ते बरे झाले आहेत. 'मला अशक्तपणा जाणवत होता. मग मी डॉक्टरांचा सल्ला घेतला. तपासणीत माझा करोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि शुभेच्छांमुळे मी बरा आहे. मी स्वत: ला आयसोलेट केलं आहे, असं गडकरींनी ट्विट करून सांगितलं होतं.