नौदलाचे विमानवाहू जहाज विराटचा अखेरचा प्रवास सुरु

September 20,2020

नवी दिल्ली : २० सप्टेंबर - भंगारात काढले जाणारे भारतीय नौदलाचे विमानवाहू जहाज विराटचा गुजरातच्या दिशेने अखेरचा प्रवास सुरू झाला आहे. अलंग येथे या नौकेला भंगारात काढले जाईल.

हे विशालकाय जहाज ओढून नेले जात असताना, नौदलातील माजी सैनिकांनी निरोप दिला. गेटवे ऑफ इंडिया येथे हे भावूक दृश्य दिसले. ६ मार्च २०१७ रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर हे जहाज मुंबईतील नौदलाच्या गोदीत उभे होते.

विराट आता गुजरातच्या अलंग या जहाजतोडणी बंदरात जात आहे. विराटचे सागरी युद्धस्मारकात परिवर्तन करण्याचे स्वप्न भंगल्यावर अखेर त्याची तोडणी होणार आहे. विराट युद्धनौका नौदलाच्या तळावर भली मोठी जागा व्यापत असल्याने तिथे इतर युद्धनौकांसाठी जागा नव्हती. अखेर मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन या केंद्र सरकारच्या मालकीच्या कंपनीने निविदा प्रक्रियेद्वारे एका खाजगी कंपनीला विराटचे भंगार देण्याचा निर्णय घेतला. भंगारात जाण्यासाठी विराटचा अखेरचा जलप्रवास सुरू झाला.

या युद्धनौकेचे युद्ध संग्रहालयात रूपांतर करण्याबाबत आंध्रप्रदेश, महाराष्ट्र सरकारने उत्सुकता दाखवली होती. मात्र, यासाठी कोणीही ठोस पुढाकार घेतला नाही. त्यातच नौदलाच्या तळावर जागा मर्यादित असताना विराटमुळे भलीमोठी जागा नाहक अडवली जात होती. या सर्व कारणांमुळे अखेर विराट भंगारात काढण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला.