पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरे लग्न करणाऱ्या अधिकाऱ्याला अटक

September 20,2020

नागपूर : २० सप्टेंबर - 'तू माझ्याशी लग्न केले नाही तर आत्महत्या करेन' अशी धमकी देणार्या वानाडोंगरी नगरपालिकेच्या मुख्याधिकार्याने त्यात पत्नीचा अनन्वयीत छळ करून तिला त्रस्त केले. एवढेच नाही तर पत्नीला घटस्फोट न देता दुसरे लग्न करून नवीन संसार थाटल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी अधिकार्यावर, त्याची आई आणि भावावर अंबाझरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, वानाडोंगरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी भरत बाबुराव नंदनवार यांच्या पत्नीने त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्याचा तसेच सात वर्षे तिचा छळ करण्याबद्दल अंबाझरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भरत हा पत्नीला बळजबरी ब्लू फिल्म दाखवून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करायचा. तिने विरोध केला असता तो तिला जबर मारहाण करायचा. ती गर्भवती असतानाही तो तिच्यावर अत्याचार करायचा. २0१७ मध्ये तिला अपघात झाला होता. मात्र, त्याने तरीही तिच्यावर अत्याचार करणे थांबविले नाही. त्याच्या आई आणि भावानेही नेहमी सुनेचा छळ केला. मुलाला समजाविण्याऐवजी ते सुनेलाच त्रास द्यायचे. १५ एप्रिल २0१४ ला सासरच्यांनी सुनेला घरातून हाकलून दिले. जुलै २0१४ मध्ये तिने मुलीला जन्म दिला. पण, त्या अधिकार्याच्या वागण्यात मात्र काहीही फरक पडला नाही. तो बायकोवर कायम अत्याचार करतच राहिला. १५ जानेवारी २0१९ ला भरत बायकोला सोडून निघून गेला. त्यानंतर त्याने सतत तिच्यावर घटस्फोटासाठी दबाव टाकला. पण, तिने त्याला घटस्फोट दिला नाही. घटस्फोट झाला नसला तरी त्याने डिसेंबर २0१९ मध्ये अचल नावाच्या महिलेशी विधीवत लग्न करून दुसरा संसार थाटला. यामुळे व्यथीत झालेल्या पत्नीने अखेर अंबाझरी पोलिस ठाण्यात आरोपी पती, सासू आणि दिर पराग नंदनवार याच्याविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी चौकशीअंती गुन्हा दाखल करून आरोपी पती भरत नंदनवार याला अटक करण्यात आली आहे.