नागपुरातील ड्रग्सच्या व्यापाराची सीबीआय व एनसीबी चौकशी करा - डॉ. आशिष देशमुख

September 20,2020

नागपूर : २० सप्टेंबर - महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरमध्येही नशेच्या औषधांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे अनेक कुटुंबावर आघात होत आहे व झाला आहे. देशाच्या मध्यभागी असलेल्या नागपूरमधून अनेक ड्रग्ज पेडलर्स याला हब बनविण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या गंभीर बाबीची दखल घेऊन येथेही आपण सीबीआय व एनसीबी चौकशी करावी, अशी मागणी माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

डॉ. देशमुख यांनी गृहमंत्री शहा यांना पाठविलेल्या पत्रात त्यांना सांगितले की, अभिनेता सुशांत सिंह यांच्या मृत्यूनंतर बॉलीवूडमधिल नशिल्या पदार्थांचा दुरुपयोग व त्याचा व्यापाराची चौकशीतून माहिती पुढे येत आहे. वर्ष २0१९ च्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकड्यानुसार महाराष्ट्रात विविध कारणांनी आत्महत्या करणार्यांची संख्या २२५६ व्यक्तींच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. यातील नागपुरात गतवर्षी ६३६ लोकांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी ९४ जणांनी नशेच्या औषधांचा दुरुपयोगामुळे आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते. 

ड्रग्ज पेडलर्स नागपूरात एका हबप्रमाणे कार्यरत असून, शेजारील राज्य जसे मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, तेलंगाणा आदी ठिकाणच्या ड्रग्ज पेडलर्सकडून एक ट्रान्सशिपमेंट क्षेत्राच्या रुपात वापरण्यात येत आहे. मानसिक सवय लावणार्या या नशेच्या औषधींमुळे लोक त्याचे गुलाम बनत आहेत. आर्थिक तंगीमुळे अनेकांना हे खरेदीकरणे अवाक्याबाहेर होते, असे अनेक आत्महत्यांमागे हे कारण असल्याचे दिसून येत आहे. इच्छापूर्तीसाठी ही नशेची तलब लुटमारी, चोरी, दरोडा आदी अशा गुन्हेगारींना प्रोत्साहन देते. सरकारी अधिकार्यांनी व विविध एजेंसींनी या धोक्याला रोखण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नारकोटिक्स कंट्रोल बोर्ड (एनसीबी) व सीबीआयने विद्यमान चौकशीच्या एक भाग म्हणून याची माहिती घ्यायला हवी की, नागपूरसारख्या लहान शहरात नशेच्या औषधांमुळे आत्महत्यांनी का घेरला आहे. त्यामुळे याची चौकशी करावी, अशी मागणी डॉ. आशिष देशमुख यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली आहे.