अस्थिविसर्जनासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू

September 20,2020

नागपूर : २० सप्टेंबर - आजीच्या अस्थी विसर्जनासाठी नागपूर येथून परिवार आणि मित्रांसह आलेल्या तीन युवकांचा किल्ले कोलार येथील कोलार नदीच्या पात्रात असलेल्या डोहात बुडून मृत्यू झाला. 

रामेश्वरी नागपूर येथील लहानुबाई सदाशिव सरवरे (रा. रामेश्वरी, नागपूर) यांचा राख विसर्जनाचा कार्यक्रम किल्ले कोलार येथील मोक्षधाम येथे आयोजित करण्यात आला होता. अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम समाप्तीच्या वेळेवर असताना शंतनू उर्फ नयन कैलास येडकर (वय २0, रा. रामेश्वरी, नागपूर) हा कोलार नदीच्या पात्रात खोलगट भागात आंघोळीसाठी उतरला. पात्राचे पाणी गढूळ हिरवट असल्याने शंतनूच्या नाकात पाणी गेल्याने तो बुडू लागला. हे दृश्य शंतनूचे मित्र हर्षित राजू येदवान (वय २0, रा. रामेश्वरी, नागपूर) व आकाश राजेंद्र राऊत (रा. रामेश्वरी) नागपूर यांनी पाहिले. दोघेही शंतनूच्या मदतीला गेले. शंतनूला वाचविण्याचा प्रयत्न दोघांनी केला. मात्र, दोघांनाही पोहता येत नव्हते. दोघांनाही खोलगट पाण्याचा अंदाज लावता आला नसल्याने शंतनू सोबतच हे दोघेही बुडाले. खापरखेडा पोलिसांना याची माहिती मिळाली. ते घटनास्थळावर पोहोचले. 

घटनास्थळावर फायर अँड रेस्क्यूची टीम, एसडीआरएफची टीम, आरसीपी पथक घटनास्थळी दाखल झाले. आकाश व शंतनू यांचे मृतदेह मिळाले. तर वृत्त लिहिस्तोवर हर्षितचा शोध लागला नव्हता. तिन्ही युवकांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी घटनास्थळी पोहोचले. परिसरातील लोकांनी गर्दी केली होती. मृतकांच्या नातेवाईकांचा टाहो पाहून उपस्थित लोकांनी हळहळ व्यक्त केली. हर्षितचा शोध सुरूच आहे. मृतक आकाश हा कॅटरींगचे काम करीत होता.