संजय झा यांनी घातले काँग्रेस नेत्यांचेच दात घशात

September 20,2020

नवी दिल्ली : २० सप्टेंबर - कृषी क्षेत्राशी संबंधित केंद्र सरकारच्या तीन विधेयकांना काँग्रेस आता विरोध करीत असली व पक्षाने आंदोलनाची तयारी चालविली असली, तरी या विधेयकावरून काँग्रेसचे निष्कासित माजी प्रवक्ते संजय झा यांनी केलेल्या रोखठोक ट्विटमुळे हा पक्ष तोंडावर आपटला आहे. झा यांनी स्पष्ट शब्दांत काँग्रेसच्या जाहीरनाम्याची आठवण करून दिल्याने पक्षनेत्यांचा ढोंगीपणा पुरता उघडकीस आला आहे.

 आमच्या काँग्रेस पक्षाच्या 2019 च्या निवडणूक जाहीरनाम्यात कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा रद्द करण्याचे तसेच कृषी माल विक्रीवरील निर्बंध काढून टाकण्याचे आश्वासन दिले होते. केंद्रातील मोदी सरकारने नेमके हेच केले आहे. यावरून भाजपा व काँग्रेस या मुद्यावर तरी एकाच बाजूला आहेत, असे ट्विटरवर रोखठोकपणे नमूद करून संजय झा यांनी काँग्रेस नेत्यांचे दात त्यांच्याच घशात घातले आहेत. 

या विधेयकांना काँग्रेसने विरोध केला असला, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बिहारला अनेक प्रकल्पांची भेट देताना कृषी विधेयकांचा जाणीवपूर्वक उल्लेख केला. काही पक्ष शेतकर्यांना संभ्रमात टाकत आहेत. पण, या विधेयकांमुळे शेतकर्यांचा खूप फायदा होणार आहे, असे पंतप्रधान मोदी ठामपणे म्हणाले आणि नेमक्या त्याचवेळी संजय झा यांनी काँग्रेसला 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या जाहीरनाम्याची आठवण करून दिल्याने पक्षनेत्यांची अधिकच कोंडी झाली आहे. कृषिविषयक विधेयकावरून तसेच शेतकर्यांच्या बाबतीत दोन्ही पक्षांची भूमिका समानच आहे, याचा पुनरुच्चार झा यांनी केला.

 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जाहीरनाम्यात ‘एपीएमसी’ कायदा रद्द करून शेतकर्यांना दलालांच्या तावडीतून मुक्त करण्याचे वचन दिले होते. केंद्रातील मोदी सरकारने कृषी विषयक विधेयकांच्या माध्यमातून तेच केले आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे. केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध करीत काँग्रेसने गुरुवारी लोकसभेतून सभात्याग केला. यानंतर शुक्रवारी संसद भवनाच्या बाहेर माध्यमांना संबोधित केले.