उद्धव ठाकरे, आदित्य आणि सुप्रिया सुळे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली खोटी माहिती

September 20,2020

मुंबई : २० सप्टेंबर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आदित्य आणि राष्ट्रवादी काँगे्रसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दाखल केलेल्या शपथपत्रात खोटी माहिती देण्यात आली आहे, असा पुराव्यानिशी आरोप एका आरटीआय कार्यकर्त्याने केल्यानंतर, निवडणूक आयोगाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला (सीबीडीटी) दिले आहेत.

 या आरटीआय कार्यकर्त्याने आयोगाकडे सादर केलेल्या अर्जात काही ठोस पुरावे दिले आहेत. पुराव्यांमुळे समाधान झाल्यानंतरच, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आयोगाने तातडीने त्याचा तपास सीबीडीटीकडे सोपविला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. एका इंग्रजी दैनिकाने आज शनिवारी याबाबतचे वृत्त दिले आहे. उद्धव यांनी आपल्या शपथपत्रात परिवारातील इतर सदस्यांविषयी जी माहिती दिली आहे, ती आदित्य यांच्या शपथपत्रात नाही. विशेषत: बँक खात्यांविषयीच्या माहितीत बरीच तफावत असल्याचे दिसून आले, असे आरटीआय कार्यकर्त्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

 उद्धव ठाकरे यांनी शपथपत्रात, पत्नी रश्मी ठाकरे व आदित्य बँकेत संयुक्त खाते असून, त्यात 9,52,568 रुपये जमा असल्याचे नमूद केले. मात्र, आदित्य ठाकरेंच्या शपथपत्रात याचा कुठेही उल्लेख नाही. याशिवाय, हिंदू विभक्त कुटुंब वर्गवारीत ठाकरे पितापुत्रांच्या नावाने असलेल्या संपत्तीच्या माहितीतही प्रचंड फरक असल्याचे दिसून आले आहे. सुप्रिया सुळे यांच्या शपथपत्रातील माहिती देखील चुकीची असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

 दरम्यान, सीबीटीडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, आगामी दहा दिवसांत आपला अहवाल आयोगाला सादर केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. हे आरोप सिद्ध झाल्यास, लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 125 ए अंतर्गत ठाकरे पितापुत्र आणि सुप्रिया सुळेंविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.