चीन भारतावर युद्ध तर लादणारच - कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (निवृत्त)

September 17,2020

०६ मे,२०२०ला लडाख मधील गलवान खोर आणि पॅनगॉन्ग सरोवर क्षेत्रात सुरू असलेल्या "मिलिटरी स्टँड ऑफ" मधे चीनची अवस्था सामरिक क्षमतेच्या जाळ्यात अडकलेल्या किटका सारखी झाली आहे.अति ऊंच पर्वतांवरील युध्दात (हाय अल्टीट्युड वॉर फेयर) आवश्यक असणारा,एकास सहा/नऊ/बारा हा सैनिकी अनुपात (कॉम्बॅट रेशो) सध्या तरी त्याच्या कडे नसल्यामुळे त्याने युध्दाचा विचारही करू नये. पण चीनला आंतरराष्ट्रीय राजकारणात आपली “सामरिक दादा” असण्याची पत राखायची असल्यामुळे, एकीकडे  चीनी परराष्ट्र मंत्री वांग यी, "वार्ता लापाच्या माध्यमातूनच तोडगा काढावा लागेल" असा घोषा लावतात तर दुसरीकडे चीनी मुखपत्र असलेल ग्लोबल टाईम्स "चीन दक्षिण चीन समुद्रात अमेरिका/मित्र राष्ट्र आणि लडाख मधे भारताशी एकाच वेळी युद्ध करून त्यांचा पराभव करू शकतो" अशा गमजा करतो.जितका चीन सीमेवरून मागे हटेल त्या पेक्षा जास्त भारतानी मागे गेल पाहिजे ही चीनी मागणी त्याच्या याच पत संरक्षणार्थ आहे. मात्र,भारतानी ती मागणी सपशेल फेटाळून लावली आहे.


दक्षिण आशियातील भौगोलिक/राजकीय परिस्थितीचा विचार केल्यास,चीननी मे,२०२०मधे  लडाखमधे कुरापत का काढली हे उजागर होत.चीनचा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) आणि चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपीईसी) या दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी काराकोरम पर्वतराजी, काराकोरम  खिंड आणि या मधून जाणारा महामार्ग  अतिशय महत्वाचे आहेत. चीननी मे आणि ऑगस्ट  महिन्यात ज्या भागात घुसखोरी केली ती ठिकाण या सर्व जागांच्या अगदी जवळ,विदिन स्ट्रायकिंग डिस्टन्स,आहेत. सीमेवरील शियोक दरबुक दौलत बेग ओल्डी मार्गाच बांधकाम जवळपास पूर्ण होत आल आहे/झाल आहे.दौलत बेग ओल्डीपासून काराकोरम  मार्ग/खिंड केवळ अठरा किलोमीटर दूर आहे. तेथे सध्या भारताची एक आर्मर्ड व एक इंफंट्री  ब्रिगेड (१२० टँक्स/आर्मर्ड व्हेईकल्स व ३००० सैनिक) तैनात आहेत.बीआरआय सीपीईसीच रक्षण करण्यासाठी आणि भारतानी त्याला हानी पोचवू नये यासाठी भारताला “स्टर्न वॉर्निंग” देण्याची गरज निर्माण झाली आहे असा चीनचा विचार असावा.दुसरीकडे,दक्षिण चीन समुद्रात चीननी अमेरिका/मित्र राष्ट्रांविरुद्ध संघर्षाची भूमिका घेतली आहे.आपल्या  संलग्न राष्ट्रांवर (लिटोरल स्टेट्स) वचक बसवण्यासाठी आणि पाकिस्तानवरील भारतीय सामरिक दबाव कमी करण्यासाठी,चीननी भारत विरोधी आघाडी उघडली आहे. चीननी लडाखमधे केलेल्या ताज्या आक्रमक घूसखोरीच्या उत्तरात;आपल सामरिक वर्चस्व असलेल्या लडाख आणि उर्वरित क्षेत्रांमधे घूसखोरी करून चीनचा काही भूभाग आपल्या ताब्यात घेण्याची संधी त्या वेळी भारतापाशी होती.पण; कोवीड १९ करोना रोगाच्या साथीमुळे भारतानी लड़ाख आणि इतर क्षेत्रांमधील “ऑपरेशनल अलर्ट” हा दर वर्षी होणारा युद्धाभ्यास थंड्या बस्त्यात टाकला आणि या वरताण  म्हणजे,अक्साई चीन नजदिकच्या झिंगजियांग उइघर आटोनॉमस एरियातील कोरला येथे झालेल्या चीनी  युद्धाभ्यासाला भारतीय इंटलिजन्स एजन्सींनी नजर अंदाज केल. प्रत्यक्ष लडाखमधे  झालेल्या लहान सहान चीनी घूसखोरीला उखडून फेकण्या इतपत सैनिकी शक्ती तेथील  १४व्या कोअरमधे होती. अस असल तरी भारतीय सरकारनी सैन्य माघारीसाठी केलेल्या; पाच कोअर कमांडर स्तर ,तीन डिव्हिजन कमांडर स्तर,चार बॉर्डर वर्किंग कमिटी स्तर आणि प्रत्येकी एक परराष्ट्रमंत्री व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरांवरील वार्तांना धुडकावून लावत, चीननी पॅनगॉन्ग त्सो,गोग्रा आणि डेस्पान्ग क्षेत्र खाली करण्यास नकार दिला.


भारत चीन युद्धाचे पडघम वाजायला सुरवात झाली आहे.युद्धामुळे होणाऱ्या हानीची पूर्ण कल्पना असूनही,आज ना उद्या चीन भारतावर युद्ध लादेल यात शंकाच नाही. कुठलही युद्ध सुरु करण्यासाठी क्रमानी; राजकीय (पोलिटिकल),दूरगामी सामरिक (ग्रँड स्ट्रॅटेजिक),सामरिक (स्ट्रॅटेजिक),सैनिकी  (ऑपेरेशनल) आणि डावपेचात्मक(टॅक्टिकल) कारवाया कराव्या लागतात. नुकत्याच, मास्को, रशियात एससीओच्या पार्श्वभूमीवर झालेल्या दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांमधील वार्तालापानांतर चीननी “सध्या असलेल्या ठिकाणांवरून आम्ही एक इंचही मागे हटणार नाही”अशी गर्जना केली. त्या नंतर त्यांनी  ०७ सप्टेंबर,२०ला, “पॅनगॉन्ग सरोवराच्या दक्षिणेतील रेचीन ला,रेझान्ग ला आणि मुखपारी शिखरां क्षेत्रांमधील गॉडपो वर भारतीय सैनिकांनी चीनी सैनिकांना घाबरवण्यासाठी ‘वॉर्निंग शॉट्स’ मारलेत” अशी बोंब मारली.प्रत्यक्षात तेथे चीनी सैनिक, भाले/तार गुंडाळलेले दंडुकेअशी मध्य युगीन हत्यार घेऊन,गलवानची पुनरावृत्ती करायला आले होते.जर १५ जूनला,गलवान घटनेत आपले २० सैनिक शहिद झाले असतांना देखील भारतीय सैनिकांनी संयम पाळत,बंदूक उचलली/फायर केल  नाही तर ते आता का ऊचलतील, हा प्रश्न देखील ही बोंब मारतांना चीनला पडला नाही. “सिच्युएशन ऑन एलएसी इज व्हेरी सिरीयस.इफ द इश्यू इज नॉट रिझॉल्व्हड थ्रू टॉक्स, एनी थिंग कॅन हॅपन” हे,परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ०७ सप्टेंबरला एक्स्प्रेस समूहाला दिलेल्या मुलाखतीत सांगितल.सप्टेंबर,२०२०च्या सुरवातीला “इंडिया मे सीक मिलिटरी ऑप्शन इफ चायना डज नॉट रिस्पॉन्ड टू ऑफर ऑफ टॉक्स” अस स्फोटक वक्तव्य देऊन, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी चीनी कॅम्पमधे खळबळी माजवली. 


अतिउच्च पर्वतराजींवरील मोठा चढ/उतार (हाय अल्टीट्युड ग्रेडियंट),ठिसूळ,खडकाळ जमीन (रॉकी आउटक्रॉप्स) आणि किचकट पुरवठा व्यवस्थापन ( लॉजिस्टिक ड्रॅग) यांच्यामुळे,आक्रमणकर्ता शत्रू (अटॅकिंग एनिमा सोल्जर) आणि सुरक्षित रक्षणकर्ता सैनिक (डिफेंडिंग सोल्जर) यांच्यातील अनुपात खूप मोठा असतो.भारत चीनदरम्यान तो,एकास सहा (लेह)/नऊ (कारगिल/ सिक्कीम)/बारा (सियाचेन) आहे/असेल.वरील सर्व गोष्टी,रक्षणकर्त्या इन्फन्ट्री सैनिकांना आक्रमणकर्त्या शत्रू विरुद्ध अतिरिक्त मदत देतात/करतात.उत्तुंग पर्वतांमधे डिफेन्सिव्ह पोझिशन अख्तियार केलेल्या रक्षणकर्त्या सैनिकांना केवळ हवाई हल्ले/क्षेपणास्त्रांद्वारे पराभूत केल्या जाऊ शकत नाही. त्यासाठी आक्रमणकर्त्याला रक्षणकर्त्याच्या ठिकाणांवर येऊन हातघाई/हाथापाईच्या लढाईत (हॅन्ड टू हॅन्ड कॉम्बॅट) हरवून/मारून टाकत त्या जागेवर शारीरिक कबजा (फिजिकल ऑक्युपेशन) करावा लागतो.जर या पैकी कोणाला अशा क्षेत्रांमधील युद्ध/चकमकींचा अनुभव असेल (बॅटल सिझनिंग ऑफ ट्रूप्स) तर त्यांच मनोधैर्य/स्वतःच्या युद्धकलेवरील विश्वास  (सेल्फ कॉन्फिडन्स अँड मोटिव्हेशन) शतपटींनी वृद्धिंगत होतो.


आजमितीला लडाखच्या सीमेवर दोन तीन आर्मी ग्रुप्सचा (१०/१५ डिव्हिजन्स:१५००० सैनिक/डिव्हिजन) जमावडा केल्यामुळे "अप ग्रेडेड मिडल लेव्हल थ्रेट" निर्माण झाली आहे. उत्तरार्थ भारतानी लडाखमध्ये तैनात असलेल्या १४ कोअरला (तीन डिव्हिजन्स) कुमक म्हणून दोन इन्फन्ट्री/माउंटन डिव्हिजन्स तेथे आणल्यामुळे चीनला हवा असणारा सामारिक अग्रकम (स्ट्रटेजिक इनिशिएटिव्ह) त्याला मिळू शकला/मिळाला नाही.जर भारतावर युद्ध लादल्या  गेल तर महत्वाकांक्षी चीन, सामरिक हालचालींच्या माध्यमातून भारताचे तुकडे करण्याचा प्रयत्न करेल.मात्र यासाठी चीनला,त्याच्यापाशी असलेल्या,सर्वदूर तैनात ७५ डिव्हिजन्समधून ३५/४० इन्फन्ट्री डिव्हिजन्स त्याच्या वेस्टर्न थिएटर कमांडमधे आणाव्या लागतील.चीनी वॉर डॉक्ट्रिननुसार,एवढ्या संख्येनी तो लडाख/अरुणाचल प्रदेश / नेपाळ सीमेवर असणारे भारताचे मेन डिफेन्सस तोडून (पेनिट्रेट थ्रू),त्याच्या मेकनाईझ्ड फोर्सद्वारे भारताच्या आत पर्यंत जलद तुफानी हल्ला (ब्लिट्झक्रेग) करेल.उत्तराखंडमधील लिपूलेखा खिंडीद्वारे मध्य भारतात उतरण्या ऐवजी चीन,लवकरात लवकर,नेपाळमार्गे बरेलीच्या पठारामधे उतरण्या/येण्याचा प्रयत्न करेल.ही, “हाय लेव्हल थ्रेट”ची संकल्पना आहे.चीनी जमावड्याचा जोडीला पाकिस्ताननी, पाकिस्तान ऑक्यूपाईड काश्मिरमधे दोन इन्फन्ट्री डिव्हीजन्स कुमक आणून ठेवली आहे.सुरवातीला एक पाकिस्तानी डिव्हिजन, सियाचेनवर स्कार्डू मार्गे उत्तरे कडून हल्ला करेल आणि दुसरी डिव्हिजन कारगिल हाईट्स किंवा त्या क्षेत्रातील पर्वतराजींवर घुसखोरी करून श्रीनगर लेह राजमार्ग अवरुध्छ (ब्लॉक) करेल.हे होत असतांनाच पीपल्स लिबरेशन आर्मी;दौलत बेग ओल्डी, गलवान कॉम्प्लेक्स,फिंगर्स एरिया,चुशुल आणि डेमचोक चुमार कॉम्प्लेक्सवर एकसाथ हल्ला करून त्याच्या आर्मर्ड कॉलम्सच्या मदतीनी, मनाली लेह  ऍक्सिस भारतासाठी बंद करेल.अस केल्यामुळे, लडाखम मधे तैनात संपूर्ण १४वी कोअरच कारगिल,लेह, चुशुल, डेमचोक, चुमार हाईट्स क्षेत्र चीनच्या हाती लागेल/लागू शकत.चीनचे उर्वरित आर्मी ग्रुप्स नेपाळ द्वारे सिलिगुरी कॉरिडॉर मधे उतरतील आणि बुमला मार्गे अरूणाचल प्रदेशात प्रवेश करेल.हा  या जोडगोळीचा मास्टर अटॅक प्लॅन आहे.


लडाख,अरुणाचल प्रदेश व सिक्कीममधे  आपले रणगाडे व इन्फन्ट्री कॉम्बॅट व्हेइकल्स, क्षेपणास्त्र आणि सुखॉय ३०,मिरज/जग्वार विमान   तैनात आहेत.तोफा व क्षेपणास्त्रांपासून सैनिकांच्या बचावासाठी तीनही क्षेत्रांमधे काँक्रीट स्टील बंकर्स आहेत. अर्ध्यापेक्षा जास्त, सतराव माउंटन स्ट्राईक कोअर उभ झाल/तयार आहे.चीनी सीमेवरील काही महत्वाच्या सैनिकी तैनातींमधे तीनपट वृद्धी करण भारतासाठी अशक्य प्राय/कठीण नाही.कारण,अतिरिक्त सैनिकांसाठी,या ठिकाणांवर पर्यायी रक्षण व्यवस्था (काँटिन्जन्सी पोझिशन्स) पहिले पासूनच तयार करून ठेवण्यात आल्या आहेत.पाकिस्तान फ्रन्टला धक्का देखील न लावता (डिन्युड) ,या चीन विरोधी ठिकाणांमधे १५/१८ अतिरिक्त इन्फन्ट्री/माउंटन डिव्हिजन्सना सहजपणे सामावून घेता येईल.वर उल्लेखलेल्या  सैनिकी अनुपाताच्या अनुषंगानी,१९६२च्या भारत चीन युद्धात केला होता तसाच पराभव या ही युद्धात करण्यासाठी (डिसायसिव्ह डिफिट), चीनला किमान ८५/९० डिव्हिजन एवढी प्रचंड सैनिकी संख्या भारत चीन सीमेवर आणावी लागेल. या युद्धसज्जतेसाठी,आगामी/ येणाऱ्या हिवाळ्यात चीनला रसद/हत्यार गोळाबारुद पुरवठा करण्याच्या प्रक्रियेत खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल.आगामी हिवाळ्यात,चीनची संसाधन/रसद/हत्यार/गोळाबारूद पुरवठा व्यवस्था,हिमालयातील लांब,फसव्या व कठीण पायवाटांमुळे (लेंगदी ट्रेचरस लाईन्स ऑफ मेंटेनन्स/कम्युनिकेशन्स) मोठ्या प्रमाणात प्रभावित होईल जे भारताच्या पथ्यावर पडेल. यामुळे अमेरिका/मित्रराष्ट्र/भारत यांच्या आर्थिक बहिष्कारामुळे आधीच चरमरीत झालेली चीनी अर्थव्यवस्था पार मोडकळीस येईल.चीनला याची कल्पना असल्यामुळे तो आता सैन्य माघारीच्या वार्तालापाची (डीएस्केलेशन टॉक्स) मागणी करतो आहे.सामरिक दृष्टिकोनातून पाहता आजमितीला लडाखमधे, सामरिक कुंठेची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे,"ऑपरेशनल स्टेलमेट फेझ विथ अडव्हांटेज इंडिया" सुरू झाली आहे अस म्हटल्यास ते वावग ठरणार नाही.यामुळेच चीन आता केवळ सीमेवरील सैनिकी माघारच नाही तर त्याच्या पर्मनन्ट लोकेशंसमधे परत जाण्याच्या गोष्टी देखील करू लागला आहे हे भारत चीन संरक्षण मंत्र्यांच्या मॉस्कोमधील ८ सप्टेंबरच्या बैठकीत दिसून पडल. पण,“टॉक्स आर अंडरवे टू रिझॉल्व्ह बॉर्डर इश्यू,बट टू व्हॉट एक्स्टेंट इट कॅन बी रिझॉल्व्हड,आय कॅन नॉट गॅरंटी” हे,संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी  चीनी संरक्षण मंत्र्यांशी रशियात झालेल्या वार्तालापानांतर स्पष्ट केल आहे.


जर चीनन भारताशी युद्ध करण्याचा निर्णय घेतला तर,पीपल्स लिबरेशन आर्मीच्या बदलत्या रणनीतींतर्गत हे “इंफॉर्मेशनलाइझ्ड नेटवर्क सेंट्रिक वॉरफेयर” प्रणालीतील युद्ध असेल. याच्या सुरवातीला  (फर्स्ट फेज), चीन सैनिकी तैनाती करून  सततच माहिती युद्ध (इन्फॉर्मेशन डॉमिनेशन कॅम्पेन) छेडेल/ सुरु करेल.लडाखमधे सध्या चीनी सैनिकी तैनाती झाली असून भारतानीच आगळीक केल्याच्या चीनी अपप्रचाराची  पहिली फेझ सुरु झाली/चालू आहे. दुसऱ्या भागात (सेकण्ड फेझ) चीनकडे असलेल्या सविस्तर माहितीनुरूप,भारताच्या “डिजिटलाईझ्ड लोकेशन ऑफ स्ट्रॅटेजिक असेट्स” वर चीनी तोफखाना,वायुसेना,रॉकेट फोर्स,ड्रोन्स  आणि इन्फन्ट्री युनिट्सच्या अचूक मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा (प्रिसिजन गायडेड मिसाईल्स) मारा केल्या जाईल. इतक्या प्रदीर्घ तैनतीमुळे चीनपाशी भारतीय सैन्य तैनातीच्या ठिकाणांचात्यांच्या उपग्रहांनी सत्यापलेला,नकाशांवरील अचूक कोष्टक संदर्भ (ऍक्युरेट ग्रीड रेफरन्स) उपलब्ध असेल.या फेझसाठी चीननी;ड्रोन/वायुसेनेसाठी तिबेटमधील नऊ विमानतळांच पुनर्गठन (अपग्रेडेशन) केल असून आपल्या रॉकेट/मिसाईल फोर्स/दूर पल्ल्याच्या तोफखान्याला अक्साई चीनमधे आणल आहे.ही फेझ अजून सुरु झालेली नाही. या कारवाईचा मुख्य उद्देश,”जॉईंट फायर स्ट्राईक करून भारताच्या महत्वाच्या संसाधनांना ध्वस्त करून इंटिग्रेटेड फोर्स ग्रुपची सामरिक खच्ची करणे,भारताची युद्धक्षमता आणि युद्ध इच्छा शक्तीला  नष्ट करणे आणि चीनच्या तिसऱ्या फेझसाठी वातावरण निर्मिती करणे  हा आहे.शेवटच्या तिसऱ्या फेझमधे इन्फन्ट्री सैनिकांद्वारे हल्ला करून भारताच्या भूभागावर कबजा केल्या जाईल (कॅप्चर ऑफ ग्राउंड बाय फिजिकल मॉपिंग अप) जसा १९६२मधे करण्यात आला होता.
रशियन फ्रंट,तायवान आणि दक्षिण चीन समुद्रासाठी लागणारी सैनिकी संख्या वगळून चीनपाशी असलेल्या ७५/८० डिव्हिजन्सपैकी  अंदाजे २०-२२ डिव्हिजन्स भारतावरील हल्ल्यासाठी उपलब्ध असतील असा संरक्षण तज्ञांचमत आहे.नव्यानी उभ करण्यात आलेल्या  वेस्टर्न थिएटर कमांडमधल्या १३/२१/४७ आर्मी ग्रुप्स मधे जवळपास दोन सव्वा दोन लाख  सैनिक आहेत. तिबेट आणि झिंगजियांगमधील बंडखोरांवर काबू ठेवण्यासाठी प्रत्येकी,४५/५० हजार सैनिक असलेल वेगळ आर्मी डायरेक्टेड मिलिटरी डिस्ट्रिक्ट स्थापन करण्यात आल आहे. यांना तोंड देण्यासाठी भारतानी १८/२० इन्फन्ट्री/माउंटन डिव्हिजन्स लडाखमधे आणून ठेवल्या आहेत.२९/३० ऑगस्ट आणि ०६/०७ सप्टेंबरला ब्लॅक टॉप/रेकीन खिंड/हेल्मेट या पॅनगॉन्ग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावरील शिखरांना ताब्यात घेण्यासाठी भारतानी अंगिकारलेल्या  आक्रमक शैलीमुळे त्याच्या “दहा पाऊल समोर जा व दोन पाऊल मागे या” या धोरणाचे बारा वाजून,चीनची दाणादाण उडाली आहे. या आधी १९९३/९६मध्ये झालेल्या “”नॉन युझ ऑफ वेपन्स” करारांद्वारे चीननी भारताचे हात बांधले कारण भारतीय सैनिक त्यांच्या सैनिकांपेक्षा सरस,युद्ध कुशल व धाडसी आहे याची कल्पना त्याला आली होती.सांप्रत सरकार खाली भारतानी “ऑफेन्सिव्ह डिफेन्सिव्ह पॉश्चर” अख्तियार केल आहे याची चुणूक चीनला, डोकलाममधे पहायला मिळाली गलवानमधे १०६ सैनिक मारल्या गेल्यावर त्याचा अनुभव आला आणि आता पॅनगॉन्ग घटनेमुळे त्याची या बद्दल खात्री पटली आहे. लडाख व अरुणाचल प्रदेशमधे जर युद्ध झालच तर भारत प्रत्येक संवेदनशील ठिकाणी एक इन्फन्ट्री ब्रिगेड (४००० सैनिक) “लोकल काउंटर ऑफेन्सिव्ह/अटॅक अगेन्स्ट शॅलो ऑब्जेक्टिव्हज”साठी वापरून एक दोन चीनी ठिकाणांवर कबजा करून वाटाघाटीची सामरिक क्षमता (टॅक्टिकल बार्गेनिंग कपॅसिटी/पावर) हासील करेल. 


पाकिस्तानी वायुसेना;आपल्या एयर  बेसेस कुठे आहेत,तेथे कोणती विमान आहेत या,भारतीय वायुसेनेच्या मर्मांसंबंधी सर्व माहिती चीनला देते यात शंकाच नाही.हिवाळ्यात; तिबेट,लडाख आणि उत्तर भारतातातील वातावरण (वेदर कंडिशन्स) कस असेल याची माहिती सिम्युलेटर्समधे टाकून भारत व चीनी वायुसेनांनी आता पर्यन्त अनेक वॉर गेम्सही खेळले/केले असतील.  भारत व अमेरिकेचे उपग्रह याच चित्रण करताहेत याची पूर्ण कल्पना असलेला चीन,सामील अत्याधुनिक जे २०,आपली लढाऊ विमान तिबेटमधील फॉरवर्ड एयर बेसेस आणि गिलगिट बाल्टिस्तानच्या स्कार्डू एयर बेसमधे उघड्यावर ठेवून भारतावर मनोवैज्ञानिक दबाव आणतो आहे.भारतीय स्थलसेनेच्या आक्रमक कारवायांना वायुसेना सर्वंकष हवाई छत्र (एयर कव्हर) देईल. भारतीय वायुसेनेकडे हिवाळ्यातही लडाखमधे कारवाई करण्याचा सराव आहे;संपूर्ण हिवाळा वायुसेना हाय अलर्ट स्टेटमधे राहील;थोड्या थोड्या  दिवसांनंतर त्यांच्या तैनातीची पूनर्समिक्षा केली जाईल.या पुढे,भारतीय वायुसेना,”डेटरन्स बाय पनिशमेंट पॉलिसी” अख्तियार करेल. कारण या पुढे वायुसेना,चायना मस्ट बिवेयर ऑफ डॅमेजेस  दॅट वुड बी कॉझ्ड टू इट्स फोर्सेस,इफ इट डिसाईड्स टू युझ हार्ड पावर,ही पॉलिसी अख्तियार करेल.  .


भारतीय वायुयुसेनेच्या मदतीला,अमेरिकेनी त्याच्या ग्लोबल स्ट्राईक कमांडमधली चार बी ५२ स्पिरिट स्टेल्थ बॉम्बर विमान ११ ऑगस्ट,२०२०ला हिंद महासागरातील दिगो गार्शियात आणली आहेत. एप्रिल मध्ये तेथे सहा बी ५२ एच बॉम्बर्स,अमेरिकन वायुसेनेच्या पॅसिफिक बॉम्बर टास्क फोर्सच्या मदतीला कुमक म्हणून पाठवण्यात आली होती.दिगो गार्शियाच्या एयर बेसमधून अमेरिका,मध्यपूर्व आणि मध्य आशियातील संवेदनशील संसाधनांचा वायु वेध (एयर स्ट्राईक) घेऊ शकतो. बी ५२ स्पिरिट स्टेल्थ बॉम्बर विमानांमधे प्रामुख्यानी; १५०० किलोमीटर्स पल्ल्याची आठ एजीएम १२९ अत्याधुनिक स्ट्रॅटेजिक क्रूझ मिसाईल आणि २००० किलोमीटर्स उंचीवरील लो अर्थ ऑर्बिट उपग्रहद्वारा संचालित सोळा जॉईंट डायरेक्ट अटॅक म्युनिशन क्षेपणास्त्र नेण्याची क्षमता आहे. पन्नास हजार फूट उंचीवर जाऊ शकणार हे विमान,इंधन न भरता सहा हजार आणि एकदा हवेत इंधन भरून दहा हजार किलोमीटर्स दूर लक्ष्यावर हल्ला करू शकत. या विमानांमधे; अत्याधुनिक आणि भरीव एयर डिफेन्स शिल्ड भेदून,उठलीही हानी न होऊ देता, लक्ष्यापर्यंत  जाण्याची क्षमता आहे. बी ५२ स्पिरिट स्टेल्थ बॉम्बर विमान;बी ५२ एच बॉम्बर्स आणि आरक्यू १७० सेंटिनेल ड्रोनच्या मदतीनी (सपोर्टींग रोल) लक्ष्य तमाम करतात.


रशियानी चीनला एस ४०० एयर डिफेन्स मिसाईल सिस्टीमची ३६ लॉन्चर्स दिली असलात तरी त्यांचे स्पेयर पार्टस न दिल्यामुळे त्यांच्या वापरावर बंधन आली आहेत. मात्र,”या पुढे चीनला ही क्षेपणास्त्र प्रणाली देणार नाही” अशी घोषणा,रशियाने त्याचा  “प्रिव्हिलेज्ड अँड स्पेशल स्ट्रॅटेजिक अलाय” भारताच्या विंनंतीनंतर केली. त्यामुळे आता भारतीय वायुसेनेला तडक आणि  बी ५२ स्पिरिट स्टेल्थ बॉम्बर्सना भारतमार्गे तिबेटवर हवाई हल्ले करण्याची पूर्ण सूट/मुभा मिळाली आहे अस म्हटल्यास ते चूक नसेल.प्रभावी विमानभेदी प्रकल्प नसल्यामुळे चीन,भारत/अमेरिकेच्या जिओसॅटेलाईट्सना त्याच्या मारक उपग्रहाद्वारे ध्वस्त करेल/करण्याचा प्रयत्न करेल.जर अस झाल किंवा खुदा ना खास्ता,भारत चीनचा सामना करण्यात असमर्थ ठरतो आहे हे उजागर व्हायला लागल तर,”यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अँड इंडिया एन्हान्सड कोऑपरेशन ऍक्ट,२०२० अंतर्गत, अमेरिका भारताला सर्वंकष समरिक मदत करेल.जिओसॅटेलाईट्सनी दिलेल्या माहितीनुसार,तिबेटच्या वेस्टर्न थिएटर कमांडमधे; सेंट्रलाइझ्ड रॉकेट फोर्स,सीमेवरील सैनिकांच्या मदतीसाठी तैनात आर्टिलरी/रॉकेट रेजिमेंट्स,रणगाड्यांचा जमावडा,सैनिकी मुख्यालय,दळणवळणाचे मार्ग,विमानतळ अशा प्रकारची अंदाजे २४/३२ संवेदनशील सामरिक लक्ष्य (स्ट्रॅटेजिक टार्गेट्स) आहेत.दिगोगार्शिया स्थित बी ५२ स्पिरिट स्टेल्थ बॉम्बरच्या प्राथमिक हल्ल्यानंतर (इनिशियल एयर स्ट्राईक) बी ५२ एच बॉम्बर्स आणि भारतीय वायुसेना, तिबेटवर आणखी हवाई हल्ले (सेकंडरी  एयर स्ट्राईक्स) करतील.


०५/०६ मे,२०२०ला चीननी लडाखमधे घूसखोरी नेल्यानंतर,२९/३० ऑगस्ट,२०२०च्या रात्री भारतानी जरी पॅनगॉन्ग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावरील वरील महत्वाच्या काही शिखरांवर कबजा केला असला तरी एकंदर सामरिक विचार करता,शांतीपूर्ण मुत्सद्दी वाटाघाटींनी हा प्रश्न सुटला तर भारताला काही सामरिक देवाणघेवाण करावी लागेल हे स्पष्ट दिसत आहे.पण जर चीननी तस करण्यास नकार दिला आणि लष्करी कारवाईची कास धरायच ठरवल तर त्यासाठी भारतानी सज्ज असायलाच पाहिजे. सीमेवर होत असलेला चीनचा सैनिकी जमावडा आणि भारताला चर्चेच्या गुऱ्हाळात गुंतवून ठेवत;नवीन रडार प्रणाली/क्षेपणास्त्रअसणारी, जमिनीवरून हवाई संरक्षण करण्या संबंधी  (ग्राउंड बेस्डएयर डिफेन्स) सर्व संसाधन उभारण्याची त्वरा, यामुळे त्याची लष्करी कारवाईची  मनिषा उजागर होते. या एयर डिफेन्स संबंधित संसाधन उभारणीमुळे तीन गोष्टी स्पष्ट होतात; अ) तिबेट भारतामधील सीमेवर चीनची हवाई संरक्षण व्यवस्था एकसंध नसून त्यात बऱ्याच मोकळ्या/रिकाम्या जागा (एयर सर्व्हेलन्स गॅप्स) आहेत ज्याचा भारतीय वायुसेना सामरिक फायदा (स्ट्रॅटेजिक/टॅक्टिकल ऍडव्हान्टेज) घेईल याची भीती चीनला वाटते आहे; ब) जर चीननी युद्ध सुरु केलं तर भारताकडून भारतीय वायुसेना पहिला वार करेल आणि क) जर अस होऊ द्यायच नसेल तर चीननी सीमेवर लवकरात लवकर; “स्ट्रॅटेजी ऑफ डिनायल” अंतर्गत, एक अशी सलग व सक्षम हवाई संरक्षण व्यवस्था उभी करणं आवश्यक आहे ज्यामुळे होऊ शकणाऱ्या सामरिक हानीचा विचार करून भारतीय वायुसेना,पहिला वार करण्यापासून परावृत्त झाली पाहिजे.चीननी तिबेटमधे हवाई हल्ला विरोधी शस्त्रास्त्रांची जमवाजमव सुरु केली आहे. पण त्याला वेळ लागत असल्यामुळे तो सध्या भारताला वार्तालापांमधे  गुंतवून ठेवतो आहे. याद्वारे; व्हाय सेंड युवर एयर क्राफ्ट्स इफ इट इज गोइंग टू सफर हेवी/ह्यूज  डॅमेजेस;  हा  प्रकट व पहिला संदेश चीन भारतीय वायुसेनेला देऊ इच्छितो. 


१९५३च्या कोरियन युद्धापासूनच “मर्यादित/नियंत्रित युद्ध:लिमिटेड वॉर” ही संकल्पना अमलात आली.अण्वस्त्रधारी राष्ट्रांमधील बखेड्यात; लक्ष्यांची निवड,भूभाग,हत्यारांची निवड यांच्यावर अमल/असर करणारी ही संकल्पना प्रकर्षानी राबवल्या जाते.लिमिटेड वॉर सर्वंकष युद्धातही बदली होऊ शकते. युद्ध शक्तीचा वापर फक्त “पॉईंट ऑफ डिसिजन”मधेच होतो/करतात.दक्षिण चीन समुद्रात अमेरिका/मित्र राष्ट्रांच्या विळख्यात अडकलेल्या चीनपाशी भारताशी केवळ मर्यादित युद्ध करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. भारताने चुशुल क्षेत्रात सांप्रत आक्रमक चीनी  घुसखोरीला आळा घालण्यात यश प्राप्त केल असून,पॅनगॉन्ग त्सोच्या दक्षिणेतील काराकोरम पर्वत शृंखलेमधील महत्वाची शिखर, ते रेझान्ग ला पर्यंत भूभागावर वर्चस्व स्थापन केल आहे.चुशुल ते डुंगती पर्यंतच्या  भूभागातील चीनी टेहाळणी यंत्रणा (सर्व्हेलन्स/ऑब्झर्व्हेशन सिस्टीम/केपेबिलिटी) एसएफएफ/विकासाच्या तिबेटी सैनिकांनी ध्वस्त केली आहे. उलटपक्षी ३० ऑगस्टच्या आक्रमक भूमिकेमुळे;  फिंगर एरिया,सीरिजप शिखर आणि स्पॅन्गुर खचक्यात (बाऊल)भारत “फायर अँड ऑब्झर्व्हेशन” द्वारे चीनला सळो की पळो करू शकतो. ३० ऑगस्टच्या कारवाईत तिबेटी सैनिक असलेल्या,स्पेशल फ्रंटियर फोर्स/विकास बटालीयन्सना काराकोरम पर्वतराजींवर भारतीय तिरंग्या बरोबर तिबेटचा झेंडा फडकवण्याची संधी देऊन,भारताने चीनला येणाऱ्या/भावी,अदृष्य  संकटाची/इनव्हिजिबल डेन्जरची, पूर्व सूचना दिल्यामुळे चीन हादरला आहे. चीननी बोहाई/तीत समुद्र/पूर्व चीन समुद्र आणि दक्षिण  चीन समुद्रात क्षेपणास्त्र फायर करून  खळबळ माजवली असली तरी चीनी नौसेना त्याच्या समुद्र किनाऱ्यांच्या आडोशांनी/किनाऱ्या नजदिकच कारवाया करते.अमेरिका व भारत सामील इतर मित्र राष्ट्रांची लढाऊ जहाज दक्षिण चीन समुद्र,तायवान सामुद्रधुनीआणि मलाक्का सामुद्रधुनीत कार्यरत आहेत.भारतीय नौसेना ग्वादार व दजिबोती बंदरांमध्ये असलेल्या चीनी जहाजांवर पाळत ठेवते आहे. भारताला “टू फ्रंट वॉर” लढण्यासाठी बाध्य करू इच्छिणारा चीन स्वतःच भारत आणि दक्षिण चीन समुद्राच्या दुधारी कैचीत सापडला आहे.अशा परिस्थितीत  अक्साई चीनमधे पूर्व किनाऱ्यावरील कुमक आणल्यास चीन त्या  बाजूनी संकटात येईल/सापडेल. यामुळे चीन लडाखमध्ये मोठं युद्ध करण्याच्या अवस्थेत नाही हे उजागर होतया असमंजसतेचा फायदा उचलत भारताला लडाखमधील चीनी घुसखोरी मुळापासून उखडून टाकण (कम्प्लिट इव्हिक्शन ऑफ इंग्रेस) सहज साध्य असेल/होईल..
भारतानी आता तरी,खाजगी/सरकारी क्षेत्रातील “रिसर्च अँड डेव्हल्पमेंट”या भरपूर वाव देत,संरक्षण विषयक हत्यार/ संसाधन/ गोळाबारूद देशातच तयार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.सरकार व खाजगी क्षेत्रांनी कुठल्याही प्रकारच अवडंबर न माजवता, या बाबतीत स्पष्ट, करारी व निर्णयात्मक भूमिका  घेण अपेक्षित आहे.चीन व पाकिस्तान नेहमीच आपले शेजारी असणार आहेत आणि त्यांच्या  भारत विषयक शत्रुत्वाच्या भूमिकेत तसू मात्र बदल होणार नाही याचीही सरकार व जनतेनी खूणगाठ बांधली पाहिजे. मागील काही महिन्यांमधे हे सूर्य प्रकाशागत उजागर झाल असल्यामुळे आता युद्धासाठी सदैव सज्ज राहण्या शिवाय आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही. डिफेन्स फोर्सेस वुड  कम्युनिकेट  देअर केपेबिलिटीज अँड द इन्टेन्ट मस्ट बी डिसर्न्ड थ्रू ऍक्शन्स अँड स्टेटमेंट्स ऑफ अवर पोलिटिकल लीडरशीप”.