कोव्हिड पॉझिटिव्ह आईकडून नवजात बाळाला कोव्हिडचा धोका अत्यल्प

September 15,2020

नागपूर : १५ सप्टेंबर - कोरोनामध्ये गरोदर महिलांना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. योग्य आहार, व्यायाम यासोबतच मास्क, स्वच्छता आणि फिजिकल डिस्टसिंग हे सर्व कटाक्षाने पाळावे. प्रसूतीपूर्वी महिलेची कोव्हिड चाचणी करण्यात येते. ती चाचणी पॉझिटिव्ह आली तरी घाबरून जाण्याची गरज नाही. योग्य सुरक्षा बाळगून प्रसूती केली जाते. प्रसूतीनंतर मातेने योग्य काळजी घेतल्यास बाळाला कोव्हिड होण्याचा धोका अत्यल्प आहे, अशी माहिती प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ किंग्ज वे हॉस्पिटलच्या सीनियर कन्सल्टंट डॉ. अनुराधा रिधोरकर यांनी दिली.

नागपूर महानगरपालिकेचे महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने ‘कोव्हिड संवाद’मध्ये आज  डॉ. अनुराधा रिधोरकर आणि प्रसिद्घ शल्यचिकित्सक तथा एकेएन सिन्हा इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ.वाय.एस.देशपांडे यांनी ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. कोव्हिडमध्ये शस्त्रक्रिया या विषयावर डॉ. वाय.एस.देशपांडे आणि गरोदर मातांनी घ्यावयाची काळजी या विषयावर डॉ.अनुराधा रिधोरकर यांनी मार्गदर्शन केले.

कोव्हिडमध्ये गरोदर मातांनी घ्यावयाची काळजी या विषयावर बोलताना डॉ.अनुराधा रिधोरकर यांनी नागरिकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देत शंकांचे निरसन केले. त्या म्हणाल्या, गरोदर मातांकडून बाळाला कोरोना होण्याचा धोका अत्यंत कमी आहे. सुरूवातीला प्रसूतीनंतर बाळाला आईपासून वेगळे ठेवले जायचे. मात्र आता बाळाला आईजवळच ठेवले जाते, ते बाळासाठी अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय बाळाला मातेने स्तनपान करणेही बाळाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. स्तनपान करताना आईने मास्क लावणे आवश्यक आहे. कारण कोव्हिड आईच्या दुधातून होत नसला तरी तो बोलताना तोंड आणि नाकातून पडणा-या तुषारांमुळे होतो. बाळाला स्तनपान करताना मातेने मास्क लावणे अत्यावश्यकच आहे. याशिवाय सर्व नागरिकांनीही मास्क लावणे गरजेचे आहे. फॅशन म्हणून मास्क वापरू नका, तो गळ्यातला दागिना नाही. आपल्या सुरक्षेचे शस्त्र आहे. त्यामुळे तोंड आणि नाक पूर्ण झाकले जाईल, या पद्धतीनेच मास्क वापरा, असे आवाहनही त्यांनी केले.

 कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांची शस्त्रक्रिया या विषयावर बोलताना डॉ. वाय.एस.देशपांडे म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांची शस्त्रक्रिया करणे हे अत्यंत धोकादायक आहे. अशा स्थितीत अत्यावश्यक शस्त्रक्रियाच केल्या जातात. उशिरा करता येउ शकणा-या शस्त्रक्रिया शक्यतो टाळल्या जातात. शस्त्रक्रिया करताना ऑपरेशन थेटरमध्ये रुग्णाचा डॉक्टर आणि इतर सहायकांशी थेट संपर्क येतो. त्यामुळे डॉक्टरांसह ऑपरेशन थेटरमध्ये उपस्थित असलेल्या सर्वांना आपले सर्व शरीर सुरक्षित ठेवण्याचे कटाक्षाने पाळणे आवश्यक आहे. शस्त्रक्रिया करताना उपयोगात आणली जाणारी साहित्य, तसेच सुरक्षेच्या सर्व वस्तूंचीही योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिकांनीही मास्क योग्य लावताना उपयोगानंतर त्याची योग्य विल्हेवाटही लावणे आवश्यक आहे. रस्त्यावर वा कुठेही मास्क फेकू नका, जबाबदारीने वागा, असेही आवाहन डॉ.वाय.एस.देशपांडे यांनी केले.