धृव पॅथॉलॉजीला ५ लाख रुपयांचा दंड

September 15,2020

नागपूर : १५ सप्टेंबर - कोव्हिड संदर्भात आय.सी.एम.आर.च्या दिशानिर्देशाचे उल्लंघन केल्याने शहरातील रामदासपेठ येथील धृव पॅथॉलॉजी लॅबवर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला असून पुढील आदेशापर्यंत पॅथॉलॉजी लॅब मध्ये तपासणीचे काम आवश्यक पूर्तता होईपर्यंत स्थगित करण्याचे निर्देश दिले आहेत. आयुक्तांनी साथ रोग प्रतिबंधक कायदा १८९७ अंतर्गत ही कारवाई केली आहे.

  सुविश्वास लॅब रामदासपेठ आणि मेट्रो लॅब धंतोली यांनाही नागपूर महानगरपालिकेद्वारे ताकीद देण्यात आली आहे. ऑनलाईन नोंदणीमध्ये तफावत, चाचणीची रियल टाईम नोंद नसणे याशिवाय बरेच अहवाल नोंदणीचे निरीक्षण न करता प्रलंबित असल्याची बाब लक्षात येताच मनपातर्फे नोटिसची कारवाई करण्यात आली होती.

मनपाचे अतिरिक्त आयुक्त संजय निपाने यांच्या नेतृत्वात पथकाने मनपाद्वारे कोव्हिड चाचणीची परवानगी देण्यात आलेल्या पॅथॉलॉजीची पाहणी केली. यामध्ये रामदासपेठ येथील धृव पॅथॉलॉजी, सुविश्वास लॅब आणि धंतोली येथील मेट्रो लॅबमध्ये आय.सी.एम.आर.च्या दिशानिर्देशानुसार एकूण चाचण्या व त्यानुसार करावयाच्या ऑनलाईन नोंदीमध्ये तफावत आढळून आली. यासोबतच लॅबमध्ये होणा-या कोव्हिड चाचणीची रियल टाईम नोंद होणे आवश्यक असताना लॅबमध्ये नोंद न करता अहवाल नोंदणीचे निरीक्षण न करता प्रलंबित ठेवल्याचे पथकाला निर्देशनास आले.

ध्रृव पॅथॉलॉजीच्या तपासणी मध्ये लक्षात आले की, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला पॉजिटिव्ह रुग्णांची माहिती वेळेवर दिली जात नाही. ५, ६ आणि ७ सप्टेंबर ला १४०७ रुग्णांची तपासणी करण्यात आली परंतू फक्त ५७१ रुग्णांची माहिती मनपाला देण्यात आली आणि ८३६ रुग्णांबद्दल माहिती दिलीच नाही. अतिरिक्त आयुक्त  संजय निपाने आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी आयुक्तांच्या परवानगीने ही कारवाई केली. त्यांनी प्रयोगशाळाला आई.सी.एम.आर. निर्देशाप्रमाणे पॉजिटीव्ह रुग्णांची माहिती मनपाला दिण्याचे निर्देश दिले. तसेच मेट्रो लॅब आणि सुविश्वास लॅब ला समज देण्यात आली आहे.