एकाच गाडीत ३ मृतदेह नेण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस

September 15,2020

नागपूर : १५ सप्टेंबर - भीषण परिस्थिती असताना कसलेही ठोस नियोजन नसल्याने शहरात दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. मृत्यू झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द केला जात नाही, त्याचे अंत्यसंस्कार करण्यासाठी नागपूर महापालिके तर्फे प्रत्येक झोनचे वेगळे पथक तयार करण्यात आले आहे. परंतु शववाहिकेचे नियोजन, गाड्यांचा तुटवडा असल्यामुळे एकाच गाडीत ३ मृतदेह नेत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. 

सोमवारी मेडिकल कॉलेज रुग्णालयाच्या शवागारामधून एकाच वाहनातून (क्र. एमएच ३१ एफसी ३७०७) मध्ये ३ मृतदेह टाकून गंगाबाई घाट येथे अंत्यविधीसाठी नेण्यात आले. कोरोना मृतकांवर तत्काळ अंत्यसंस्कार होणे गरजेचे आहे. मागील काही महिन्यांपासून पालिका कर्मचाऱ्यांचे पथक अविरत कार्यरत आहे. यातील काही कर्मचारी बाधितही झाले. अनेकदा भीतीपोटी हे काम न करण्याची मानसिकताही काही जण बोलून दाखवतात. एकंदरीत महापालिकेतील कर्मचाऱ्यांचा ताण प्रचंड वाढला आहे. अधिकारी वर्गही पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतले आहे. मुख्य अधिकाऱ्याविना यापुढचीही परिस्थिती आटोक्यात राहावी यासाठी प्रशासनाने आजपासूनच उपाययोजना करणे गरजेचे आहे.