रक्षा विसर्जनासाठी गेलेल्या इसमाचा बुडून मृत्यू

September 15,2020

भंडारा : १५ सप्टेंबर - काकाची रक्षा विसर्जनासाठी गेलेल्या एका इसमाचा वैनगंगेच्या बुडून मृत्यू झाल्याची घटना भंडारा तालुक्यातील सालेबर्डी येथे घडली. उपस्थितांनी त्याला तात्काळ बाहेर काढून वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु यश आले नाही. 

सचिन जयकांत तितिरमारे (४२) रा. एमएसईबी कॉलोनी भंडारा असे मृताचे नाव आहे. सचिनच्या काकांचे निधन झाले होते. अंत्यसंस्कारानंतर नातेवाईकांसोबत ते भंडारा तालुक्यातील सालेबर्डी येथे रक्षा विसर्जनासाठी गेले होते. पूजाविधी सुरु असताना सचिन आणि त्यांचा आतेभाऊ वैनगंगेच्या पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने सचिन नदीत बुडाला. हा प्रकार काही वेळातच उपस्थितांच्या लक्षात आला. सचिनला तात्काळ बाहेर काढून प्रथमोपचार करण्यात आले. आणि भंडारा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करताच त्याला मृत घोषित केले. सचिन हे वरठी येथील सनफ्लॅग कंपनीत नोकरीवर होते. त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा असा परिवार आहे. सचिनच्या मृत्यूची वार्ता पसरताच त्याच्या घराजवळ मोठी गर्दी झाली प्रत्येकजण हळहळ व्यक्त करीत होता.