दारू गाळणाऱ्याने स्वतःच नष्ट केला मोहसडवा आणि दारू

September 15,2020

गडचिरोली : १५ सप्टेंबर - गडचिरोली शहरानजीकच्या शेतशिवारात हातभट्टी लावून दारू गाळणाऱ्याला मुक्तिपंथ चमूने समज दिली असता त्याने स्वतःच मोहसडवा व दारू नष्ट केली. तसेच पुन्हा दारू विक्री करणार नसल्याची ग्वाही दिली. 

कोरची शहरातील वार्ड १३ येथील दर्राटोली  येथील बहुतांश जणांकडे शेतजमीन असून त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. मात्र, वार्डातील काही विक्रेते शेतीकडे दुर्लक्ष करून दारूविक्री करतात. यामुळे या भागात मुबलक प्रमाणात दारूसाठा उपलब्ध होतो. यामुळे नवयुवक व्यसनाच्या आहारी गेले आहेत. अनेक महिला विधवा झाल्या आहेत. या वार्डातील दारूविक्रेते शेतशिवारात दारू गाळून घरी विक्री करतात. शेतशिवारात हातभट्टी सुरु असल्याची माहिती मुक्तिपंथ तालुका चमूला मिळाली. त्यानुसार पाहणी केली असता दारूभट्टी सुरु असल्याची दिसून आली. त्या दारू विक्रेत्याला दारूचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. यावेळी शेतशिवारात काम करणाऱ्या महिलांच्या उपस्थितीत दारू विक्रेत्याने ६० किलो मोहसडवा  व ४ लिटर मोहाची दारू स्वतःच्या हाताने नष्ट केली. तसेच पुन्हा दारू विक्री करणार नाही, अशी ग्वाही दिली. यावेळी मुक्तिपथ तालुका संघटक निला किन्नाके उपस्थित होत्या.