अँपल इंकार्पोरेट्स च्या कंपन्या आता बाजी मारणार

September 15,2020

नवी दिल्ली : १५ सप्टेंबर - देशाला जागितक पातळीवरील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांचे केंद्र करण्यासाठी जाहीर कण्यात आलेल्या ५.६ अब्ज डॉलर्सच्या उत्पादननिगडित प्रोत्साहन योजनेत ऍपल इन्कॉर्पोरेट्सच्या आयफोन जुळवणीदार कंपन्या बाजी मारण्याची शक्यता आहे, असे या घडामोडींची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले. जागतिक पातळीवर ठसा उमटवलेल्या कंपन्या आपली उत्पादने चीनबाहेर हलवण्याचा विचार करीत आहेत. त्याचा फायदा भारत घेत आहे.

देशात पुढील पाच वर्षांत १५० अब्ज डॉलर्स किमतीच्या भ्रमणध्वनी उत्पादन योजनेस केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी होणार्या बैठकीत मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. या योजनेसाठी आयफोनची जुळवणी करणारी कंपनी फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुप, या कंपनीची सहकारी विस्ट्रॉन कॉर्पोरेशन आणि पेगाट्रॉन कॉर्पोरेशनसह काही कंपन्यांनी अर्ज सादर केले आहेत. या कंपन्यांचे प्राथमिक अर्ज उच्चाधिकार असलेल्या सरकारी समितीने मंजूर केले आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

जगभरात विकला जाणार्या प्रत्येक आयफोनची जुळवणी या तीन कंपन्यांकडून केली जाते आणि या कंपन्यांचे उत्पादन केंद्र सध्या चीनमध्ये आहे. उत्पादननिगडित प्रोत्साहन योजनेंतर्गत, जागतिक उत्पादक कंपन्यांना भारतात घेतलेल्या भ्रमणध्वनींच्या उत्पादनाची दरवर्षी जी निर्यात वाढेल त्यावर प्रोत्साहन दिले जाणार आहे. विदेशी फोन उत्पादकांपैकी ऍपल आणि सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशनने या कंपन्यांनी या योजनेसाठी अर्ज सादर केले आहे. चीनमधील सर्वाधिक मोठी फोनउत्पादक कंपनी हुआवेई टेक्नॉलॉजीस कॉपोरेशन, ओप्पो आणि विवोसारख्या भ्रमणध्वनींची उत्पादक कंपनी बीबीके समूहाने या योजनेत अर्ज केलेले नाही, हे विशेष.

ऍपलसह नामांकित कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकारने विचारपूर्वक योजना आखली आहे. आयफोनचे उत्पादक देशात आल्यास, संपूर्ण परिसंस्था त्यांचे अनुकरण करतील, असे मत लावा इंटरनॅशनलचे संस्थापक अध्यक्ष हरीओम राय यांनी व्यक्त केले. पुढचे पाच वर्षे नाट्यमय ठरणार आहेत आणि भ्रमणध्वनी उत्पादनात भारत हा नवीन मोठा उत्पादक देश ठरणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.