प्रसिद्ध कुस्तीपटू नाविद अफकारी याला फासावर लटकवले

September 15,2020

नवी दिल्ली : १५ सप्टेंबर - इराणमधील प्रसिद्ध कुस्तीपटू नाविद अफकारी याला शनिवारी मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. इराणमधील सरकारी वृत्तसंस्था असणार्या आयआरएनए या वृत्तवाहिनीच्या हवाल्याने सीएननने हे वृत्त दिले आहे. आपल्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येऊ नये असा नावीदचा अर्ज फेटाळून लावण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

२७ वर्षीय नाविदला शिराज येथील तुरुंगामध्ये फासावर लटकवण्यात आले. इराणमधील सरकारी पाणी आणि मलनिस्सारण विभागाचा सुरक्षा अधिकारी हसन तुर्कमन याच्या हत्येच्या गुन्हय़ाखाली नाविदला शिक्षा सुनावण्यात आली होती. २0१८ मध्ये शिराज शहरातील हिंसेमध्ये हसनचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात नाविदला अटक करण्यात आली होती असे मीझान या सरकारी वृत्तवाहिनीने म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने नाविदला मृत्यूदंडाची शिक्षा दिल्याच्या वृत्ताने धक्का बसल्याचे म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बेच यांनी इराणमधील सर्वोच्च नेते आणि इराणच्या अध्यक्षांना मागील आठवड्यामध्ये नाविदची शिक्षा माफ करावी अशी मागणी करणारे पत्र लिहिले होते, असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे.