लेखनरुपाने गवसलेली समृद्धवाट

August 01,2020

विविध वृत्तपत्रांमध्ये वृत्तछायाचित्रकार म्हणून सेवा पुरवण्यापासून सुरूवात केलेल्या अविनाश पाठक या छायाचित्रकाराने गेल्या चार दशकाच्या धडपडीतून व पडझडीतून स्वत:ला सावरत, आवरत, गोळा करत व सुसंघटित करण्याचा प्रयत्न  करत करत जो प्रवास केला तो त्याला आज अकरा ग्रंथांच्या लेखकापर्यंत घेऊन गेला आहे. तो सारा प्रवास, त्याचे टप्पे कधी अगदी जवळून, कधी काही अंतरावरून बघणार्‍या अनेक नागपूरकरांमध्ये माझाही समावेश आहे.

नागपुरातील धरमपेठच्या प्रसिद्ध लक्ष्मीभुवन चौकातील आजच्या अनेक सुविख्यात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक नेतृत्वाच्या तेव्हाच्या मुक्कामाने गजबजलेले असणार्‍या लालाजींच्या तत्कालीन प्रख्यात संगम हॉटेलसमोरच्या  इमारतीतला अविनाश पाठकांचा तो छोटासा फोटो स्टुडिओ, हा स्टुडिओ कमी आणि विविध क्षेत्रातील ज्येष्ठांपासून तो समवयस्कांपर्यंतच्या त्यांच्या गोतावळ्यातील अनेकांच्या एकत्र येण्याचे, भेटण्याचे, चर्चा करण्याचे, योजना, प्रकल्प  आखण्याचे आणि ते पूर्णत्वास नेण्यासाठी काय काय करायचे वा न करायचे यांच्या चर्चेचे गजबजलेले स्थान असायचे.

आजही ती जागा कुलुपबंद अवस्थेत जणू जपून ठेवल्यासारखी तशीच आहे. त्याकाळी त्या स्टुडिओत विष्णूपंत, म्हणजे अविनाशचे वडीलही असायचे. त्यांची अविनाशला या व्यवसायात सुस्थिर झाल्याचे पाहण्याची तीव्र इच्छा त्यांच्या बोलण्यातून सततच जाणवायची. अविनाशवर त्यांचा खूप जीव होता. त्याने काय व्हायचे ते व्हावे पण काही तरी नक्की व्हावे ही त्यांची तळमळ, कळकळ मला अजूनही आठवते. ते रस्त्यांचे स्नेही प्रा. शरद पाटलांप्रमाणेच ज्या इतरांजवळ ती बोलून दाखवत त्यात मीही एक होतो. आज अविनाशला अकरा पुस्तकांचा लेखक झालेला त्यांनी बघितले असते तर त्यांना तो काय झाला यापेक्षाही काहीतरी महत्वाचे झाला याचा जो आनंद वाटला असता तो मी त्यांच्या चेहर्‍यावर कल्पनेने स्मरण करूनही अनुभवू शकतो.

अविनाशचा माझा परिचय त्या नंतरचा. अगोदरचा परिचय विष्णूपंतांचाच. तरुण भारत, लोकमत, लोकसत्ता, नागपूर पत्रिका, मातृभूमी, देशोन्नती, जनशक्ती, ऐक्य, गावकरी, कृषीवल, उद्याचा मराठवाडा अशा वृत्तपत्रांमधून वेळोवेळी लेखन  करीत श्रमिक एकजूट, तरुण भारत, गावकरी, लोकशाही वार्ता यातून स्तंभलेखन करीत, महासागर, उद्याची खबर, तरुण भारत यात प्रत्यक्ष काही काळ काम करीत, एकमत, हिंदुस्थान, कृषीवल, वृत्तमानस, लोकपत्र यांच्यासाठी नागपूरचा  प्रतिनिधी म्हणून काम करत, अशा जिल्हा वा विभागीय पातळीवरील पत्रांमधील लेखनाचा वेगळाच अनुभव अविनाशने गोळा केला. ते करता करताच अविनाश पाठक हे नाव सिद्ध होत गेले.

एका पाक्षिकाचे आणि ‘रामटेकच्या गडावरून’ या साप्ताहिकाचे संपादनही त्यांनी केले. त्याचे अनेक महत्वपूर्ण विषयावरील महत्वाचे विशेषांकही त्यांनी काढले. सुमारे दहा वर्षे दूरदर्शनचे मान्यताप्राप्त वृत्तछायाचित्रकार म्हणूनही त्यांनी काम  केले. मुंबई दूरदर्शनच्या विविध गाजलेल्या कार्यक्रम निर्मितीमध्ये त्यांचा सहभाग राहिला. विदर्भाला त्यातून सर्वाधिक स्थान लाभले. फिल्मस डिव्हिजन आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती व प्रसारण विभागाचेही मान्यताप्राप्त  वृत्तछायाचित्रकार ते राहिले. आकाशवाणीच्या नागपूर वृत्त विभागातही साप्ताहिक वृत्तपट निर्मितीचे काम त्यांनी केले.

विदर्भ, विदर्भाचा विकास, विदर्भ विकासाचा अनुशेष, छोटी राज्ये, विदर्भातील कृषी समस्या, शेतकरी आत्महत्या, सिंचनाच्या समस्या या व अशा विषयावर अलीकडच्या काळात त्यांनी भरपूर विचार केला, त्यावर लेखन केले. डॉ. श्रीनिवास खांदेवाले ह्यांनी या दिेशेने त्यांचा प्रवास काही काळ यशस्वीरित्या वळता करून त्यांच्यातल्या वक्त्याला, वकृत्वाला उत्तम संधी देत व्यासपीठ उपलब्ध करून दिले. तर डॉ.द.भि. कुळकर्णी यांनी अविनाश पाठकांना त्यांच्यातले लेखन गुण  हेरून ग्रंथलेखनाला, साहित्यलेखनालाही प्रवृत्त केले. डॉ. श्रीकांत चोरघडे, अशोक मोटे, अशा कितीतरी थोरामोठ्यांनी त्यांना या प्रवासात सततच साथ दिली आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातूनही पाठकांनी जीवनाच्या एका टप्प्यावर बराच वेळ  देत महत्वाचे समाजकार्यही केले.

दृकश्राव्य माध्यमांची ताकद त्या काळात हेरण्याची दृष्टी अविनाश पाठकांना जी लाभली होती ती त्यावेळी अनेकांना नसल्याने त्याचे त्या दिशेने चाललेले प्रयत्न, धडपड इतरांना मात्र हास्यास्पद वाटत असे. त्या माध्यमांच्या ताकदीचा या देशात प्रसार-प्रचार व्हायचा काळ येण्यापूर्वीच अविनाश पाठकांनी दृक-श्राव्य माध्यमांचे महत्व हेरून त्यातील निर्मितीसाठी एक फार महत्वाकांक्षी प्रकल्पही हाती घेतला होता. अनेक दिवस अनेक महत्वाचे लोक त्याभोवती त्यांनी गोळाही केले  होते. तो प्रकल्प खरोखरच साकारला असता तर अविनाश पाठकांकडे बघण्याच्या नागपूरकरांच्या दृष्टीतही नक्कीच अभूतपूर्वच बदल झाला असता, पण महत्वाचे तसे होणे नव्हते. झालेही नाही. कारण अविनाश पाठक विदर्भातला होता.  मुंबई-पुण्याकडे असता तर त्याचे व त्या प्रकल्पाचे नक्कीच सोनेच झाले असते. विदर्भाच्या मागसलेपणाच्या नावाने केवळ गळे काढणार्‍यांच्या अंगी देखील अविनाश सारख्यांच्या मागे कळकळीने उभे राहण्याची समग्र सांस्कृतिक विकासाची दृष्टीच नव्हती हेच खरे. ती असती तर त्या प्रकल्पातून विदर्भाचे वेगळेच चित्र केव्हाच साकारले असते हे नक्की. बर्‍याच खडतर प्रवासानंतर आज अविनाश पाठकांना जे जरा बरे आणि सुस्थिर दिवस व जीवन लाभले त्याचा सार्‍या गुण- दोषांसह त्यांच्यावर प्रेम करणार्‍या त्यांच्या चाहत्यांना तरीही विशेष आनंद आहे, तो या पार्श्‍वभूमीवरच.

महाराष्ट्रातील अनेक थोरा-मोठ्यांसोबत उठबस अविनाश पाठकांची तेव्हापासूनच होती आणि आपण त्यातल्या अनेकांपेक्षा उणे नसल्याची आत्मजाणीवही त्यांच्या  हर्‍यावर आणि व्यक्तिमत्वात सततच ठसठशीतपणे कायमच राहिली होती. त्याचे अनेकांना आश्‍चर्यही वाटे.

हे सारे विस्ताराने यासाठी सांगायचे आणि समजून घ्यायचे की हा सारा प्रवास ही लेखकाची घडणावळ असते. व्यक्तिमत्वाच्या घडणीसाठी मोजलेली ती किंमतही असते. त्यांच्यासारख्या एखाद्याचा असा लेखक का आणि कसा होतो आणि  अशा जीवनप्रवासातून जेव्हा लेखक साकारतो तेव्हा त्यालाही तो त्याच्यात केव्हापासून होता हे कसे ठाऊक नसते आणि ते ठाऊक झाल्यावर त्याच्याकडून ज्या आत्मविश्‍वासाने व वेगळेपणाने लिहिले जाते तेव्हा अशाच एखाद्या लेखकाचे नाव अविनाश पाठक असू शकते.

अशा या प्रवासात बघता बघता त्यांच्याकडून अकरा प्रकाशित-संपादित ग्रंथसिद्ध होतात तरीही या वाढत वाढत वाढतच गेलेल्या अविनाश पाठकांकडे बघण्याऐवजी अजूनही अनेक जवळच्याही गावकर्‍यांना हा अविनाश पुरेसा ठाऊक  नसावा, त्याची फारशी कल्पना नसावी आणि अजूनही त्यांना लक्ष्मी भुवन चौकातील त्या छोट्याश्या स्टुडिओतील उंच खुर्चीवर मालकाच्या ऐटीत बसलेला अविनाश पाठकच लक्षात राहावा ही कोणाची वाढ खुंटल्याचे लक्षण म्हटले पाहिजे? प्रस्तुतचा ‘थोडं आंबट, थोडं गोड’ हा संग्रह त्यांच्या मते ‘ललित’ लेखसंग्रह आहे. मात्र यात ललित, राजकीय लेख, व्यक्तीचित्रे असे सारे काही आहे. मुळात हे सारे ‘स्तंभलेखन’ आहे हे अगोदर समजून घ्यायला हवे. म्हणजे या लेखनाला  पडणार्‍या मर्यादाही लक्षात येवू शकतात. त्यातही ते तथाकथित मुख्यप्रवाही, उच्चभ्रू व प्रस्थापित अशा दैनिकांपेक्षाही जिल्हा, तालुका आणि विभागीय पातळीवरील फारशा ज्ञात नसणार्‍या पत्रांसाठीचे स्तंभलेखन आहे. खरे तर त्यामुळेच एवढे  लेखन करूनही त्यांचे नाव लेखन विश्‍वात जेवढे सुस्थिर असायला हवे तेवढे याकरिता नाही की ज्यांच्यात ते नाही त्यांच्यापैकी अनेकांना त्यांनी ज्या पत्रात लिहिले त्यांची नावे देखील एकतर ठाऊक नाहीत आणि अशा ठिकाणच्या या  पत्रांकडे बघण्याचा, त्यांचे महत्व जाणण्याचा, त्या पत्रांचे वेगळेपण, त्यांच्या वाचकांचे स्थानिकत्व जाणण्याचा, त्यांच्यासाठीचे विषय, त्याचा विस्तार, त्यासाठीची भाषा, शैली, मांडणी या सार्‍यांकडेच दुर्लक्ष करून आपला त्या विश्‍वाशी संबंधच  न येऊ देण्याचा व ते विश्‍वच उपेक्षित राखण्यातच धन्यता बाळगण्यातच आपली उच्चभ्रू अभिरुची सुरक्षित मानण्याचा आपला तथाकथित प्रतिष्ठित नागरी स्वभावही आहे. त्यामुळे अशा लेखक-लेखनाकडे बघण्याचा, ते समजून घेण्याचा तर  प्रश्‍नच दूर. तरीही अविनाश पाठकांनी या अशा उपेक्षेच्या पार्श्‍वभूमीवरही उठून दिसण्याचा जो दखलपात्र असा अथक प्रयत्न केलेला आहे त्याची यथायोग्य पोच पावती आपणही त्यांना देणे लागतो हे भान आपण बाळगण्याची गरज आहे.

संस्कृतिच्या व्यापक संकल्पनेतील महत्वाच्या आणि विशेषत: महानगरबाह्य अशा ठिकाणच्या महत्वाच्या माध्यमांमधून व्यक्त होणार्‍यांचे लेखन हे ‘दर्जाबाह्य’ समजण्याची उच्चभ्रूवृत्ती ही मुळातच लोकशाहीला मारक असते. या ठिकाणच्या माध्यमांचा वाचक हाच खरा जानपद व खर्‍या अर्थाने वाचकही असतो. त्या परिघातील त्यांची उपेक्षा करून जपली जाणारी संस्कृति ही एकारलेली अभिजन संस्कृती होत जाते. त्या पातळीवरील वाचकाला अविनाश पाठक हे नाव महानगरी जाणिवेच्या वाचक व अभिरूची संपन्नांपेक्षा अधिक व उत्तमरित्या ठाऊक आहे, तोच त्यांच्या लेखनाचा व वाचकांचा परीघ असल्याने त्यांचे विषय व लेखनही आपसुकच त्याच पातळीवरील गरजेनुसार बेतले जाते हे ओघाने आलेच.

प्रस्तुत लेख संग्रहातील लेखांच्या निमित्ताने, ‘लेखक व मान्यवर सामान्यांच्या घरी अशी योजना राबविण्याची वेळ येण्याची कारणे शोधणारी’, ‘आकाशानंद’ या आकाशवाणी माध्यमातून बालकांना संस्कारित करीत एक पिढी घडवणार्‍या निर्मात्या-लेखकाची माहिती, महिलांच्या ‘पदरा’सारख्या ड्रेसकोडची सोदाहरण चिकित्सा, वृद्धांची अवस्था, दोन सुहृदांच्या निधनाची व्यथा, विद्यमान मुख्यमंत्र्यांचे गावमित्र असणारे वडील गंगाधर फडणवीस यांचे उत्तम असे व्यक्तीचित्र,  आर.के. लक्ष्मण त्यांनी दाखवलेला कॉमन मॅन, तारुण्यातले आपण केलेले उपद्रव, स्वत:चे अनेक वाङ्मयीन उद्योग, लेखणी ते बॉलपेनचा रम्य प्रवास, बोर्डिंग आणि वृद्धाश्रमाचे साम्य, श्रीहरी अणे यांचे महाधिवक्ता होण्याच्या निमित्ताने झालेला  आनंद, ‘लहान वयातला चष्मा’ मधला संदेश, लिहायला सुचणारा विषय कसा सुचतो त्याची कथा, व्यसनाधीनतेला मिळत चाललेली नको ती समाजमान्यता, अकारणच्या प्रसिद्धीची निष्कारणची हाव, सुजाण व्यवस्थेला आलिंगन देण्याचा  सुंदर उपकारच विचार, सुजाण पालकत्व, मोमिनपुर्‍यातले फरोक नक्काश, अनेकांचे कुलदैवत असणारी गणोजाची देवी, तिच्या नावाची कथा, चंद्रपुरी वडाभाताचा वडा, त्याचा इतिहास, नागपूर टाईम्स, नागपूर पत्रिकेचे बंद पडणे, त्याची व्यथा, नागपूरच्या दीक्षाभूमीवर व्यक्त होणारा बेगडी कळवळा, गडकरी स्मारकाच्या दुर्देवी व्यथा, नागपूरच्या, उन्हाळ्यात अंगणात झोपण्याच्या दिवसाच्या आठवणी, बाबा आमटेंची दोन्ही मुलं, त्यांच्या आठवणी, कुमार काटे या बहुगुणी,
बहुआयामी माणसाचं व्यक्तिचित्र, वामनराव चोरघडे, पी.आर. जोशी, डॉ. विनय वाईकर, मुकुंदराव किर्लोस्कर यांची व्यक्तीचित्रणे, सामान्य माणसाचा कांदा, नितीन गडकरी-कांचन गडकरींची कौटुंबिक कहाणी, डॉ.द.भि.कुळकर्णी, प्रदीप  निफाडकरची गेलेली मुलगी, प्रा. उमाकांत कीर, अशा कितीतरी विषयांना अविनाश पाठकांनी सक्षमरित्या हात घातला गेला आहे.

खरे तर यातल्या व्यक्ति व त्यांच्यावरील व्यक्तिचित्रणे बाजूला काढून ती अधिक विस्ताराने पुनर्लेखन करून, अधिकच्या काही व्यक्तिचित्रणाची भर त्यात घालून त्या लेखांचा स्वतंत्र संग्रह करणे केव्हाही अधिक इष्ट ठरले असते, एवढ्या महत्वाच्या व्यक्ति व त्यांचे अनुभव आणि त्याचे उत्तम चित्रण त्यात आले आहे. तसेच इतरही विषयांबाबत झाले आहे. सार्‍याच प्रकारचे लेखन एकाच संग्रहात आले की अनेकदा त्यातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गुणवैशिष्ट्यांकडे वाचकांचे लक्ष  केंद्रित न होता ते विभागले जाते, तसे या संग्रहाबाबत वाचकांचे होणार आहे. तरीही या लेखनाच्या काही अंगभूत मर्यादा वगळता जे आहे ते महत्वाचे, वैशिष्ट्यपूर्ण व स्वानुभवाधारित निरीक्षणाचा उत्तम आविष्कार आहे हे महत्वाचे.

अविनाश पाठकांच्या व्यक्तिमत्वाची ‘हॉरिझांटल’ वाढ त्यांच्या ‘व्हर्टिकल’ वाढीपेक्षा किती व्यापक आहे हे या लेखसंग्रहातून सतत जाणवत राहते. कितीतरी शक्यता असलेल्या या व्यक्तिच्या व्यक्तिमत्वाला त्या त्या वेळी त्या त्या संधी लाभत्या  तर त्यांच्यातल्या गुणांचे जे चीज झाले असते ते पुरेसे झालेले नाही हे सतत जाणवत राहते. हे जाणवणे हेही या लेखनाचे सामर्थ्य आहे आणि जे राहून गेले असे वाटते ते त्यांच्या भवतालाला त्यांच्याबद्दलच्या नसलेल्या जाणिवेचे अपयश हेही  त्यातून लक्षात येते.

अशी माणसे जपायची असतात, त्यांची साथ-सोबत करायची असते, ती नीट केली तरच त्या त्या भागाचा, विभागाचा सांस्कृतिक विकास घडत असतो. मात्र याबाबतीत विदर्भ नेहमीच उदासीनच राहिलेला आहे. अविनाश पाठक हे  व्यक्तिमत्वही अशा उदासीनतेचा एक बळी आहे. मात्र आपल्या वाट्याला येणार्‍या अपयशांचे रुपांतरही वेगळ्या वाटांनी यशस्वी होण्यात करता येते, तशी वाट अविनाशला लेखनाच्या रुपाने मिळाली. ती अधिकाधिक समृद्ध, संपन्न होवो ही  सदिच्छा.

- डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी
भूतपूर्व अध्यक्ष
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ