देशभरातील नामवंत फुटबॉल प्रशिक्षक देणार नागपुरात प्रशिक्षण

July 31,2020

आई कुसुम सहारे फाऊंडेशनचा पुढाकार : विविध असोसिएशन, संस्थाचा सहभाग

नागपूर : रेशीमबाग मैदानावर दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी आई कुसुम सहारे फाऊंडेशन आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने फुटबॉल सामन्यांचे आयोजन करण्यात येतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा हे सामने रद्द करण्यात आले आहे. येणाऱ्या उन्हाळ्यात नवा उपक्रम हाती घेण्यात येणार असून देशभरातील नामवंत फुटबॉल चमूचे प्रशिक्षक नागपुरातील 16 वर्षाखालील मुलांना प्रशिक्षण देणार आहे.
या अभिनव उपक्रमाची संकल्पना मनपाचे माजी क्रीडा समिती सभापती तथा आई फॉउंडेशनचे अध्यक्ष नागेश सहारे यांनी मांडली आहे. दरवर्षी होणाऱ्या फुटबॉल सामन्यांचे यंदाचे 16 वे वर्ष होते मात्र, कोरोनामुळे यावर्षीच्या सामन्यात खंड पडला. ही उणीव भरून काढण्यासाठी आणि फुटबॉल क्षेत्रात येणाऱ्या भावी खेळाडूंसाठी प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचा मानस श्री नागेश सहारे यांनी व्यक्त केला.
यासंदर्भात अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, 16 वर्षांखालील मुलांना देशातील नामवंत फुटबॉल चमुच्या प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देणे, ही अभिनव संधी आम्ही उपलब्ध करून देत आहोत. मोहन बगान, ईस्ट बंगाल, नॉर्थ ईस्ट, ओडीसा एफ.सी., एफ.सी. गोवा, बंगलोर एफ.सी., हैद्राबाद एफ.सी. आदी नामवंत चमूचे प्रशिक्षक यामध्ये सहभागी होतील. या उपक्रमात मनपा, रेल्वे, पोलिस आदी विभागासोबतच खासदार क्रीडा महोत्सव, नागपूर फुटबॉल असोसिएशन आणि विविध क्रीडा संस्थाचे सहकार्य लाभणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, ऑल इंडिया फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या मार्गदर्शनात हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येईल. यशवंत स्टेडियम, पोलिस मुख्यालय मैदान, मोतीबाग, अजनी आणि रेशीमबाग या मैदानावर एकाचवेळी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येईल. सदर प्रशिक्षण पूर्णपणे निःशुल्क असून या संधीचा विद्यार्थ्यानी लाभ घ्यावा असे आवाहन आई कुसुम सहारे फॉऊंडेशनचे एडविन अंथोनी, अब्दुल रफिक यांनी केले आहे.