पोस्टमार्टम... अन्वयार्थ चंद्रकांतदादा पाटलांच्या विधानाचा

July 31,2020

भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रकातदादा पाटील हे गत दोन दिवसांपासून वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. याला कारण झाले आहे ते त्यांचे एक वक्तव्य. भविष्यात आम्ही निवडणूका स्वतंत्रपणेच लढवू. मात्र वेळ  आली तर महाराष्ट्राच्या हितासाठी गरज पडल्यास शिवसेनेलाही आम्ही साथ देऊ असे वक्तव्य दादांनी केले. त्यानंतर दादांना समाज माध्यमांवर इतके ट्रोल केले गेले की देवेंद्र फडणवीसांना याबाबत खुुलासा करावा लागला.

इथे दादांवर टीका करणार्‍यांनी या विधानाची एक बाजू लक्षात घेतली. मात्र प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. अनेकदा एक बाजू बघून आपण व्यक्त होतो. मात्र दुसरी बाजू प्रसंगी काहीशी वेगळीही असू शकते. अशावेळी दुसरी बाजू  तपासून बघायला काय हरकत आहे? याच भावनेतून आज हा मुद्दा मी वाचकांसमोर ठेवतो आहे.

झाले असे की सोमवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी महाराष्ट्रातील सर्व पदाधिकार्‍यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी आता महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणण्याची तयारी करा असा संदेश राष्ट्रीय अध्यक्षांनी महाराष्ट्रातील पदाधिकार्‍यांना दिला. त्यावर बोलताना दादांनी हे वक्तव्य केले होते.

मुळात महाराष्ट्रात जी सध्याची राजकीय स्थिती आहे त्या पार्श्‍वभूमीवर या विधानाकडे बघणे मला गरजेचे वाटते. महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणूकांमध्ये शिवसेनेने भाजपशी युती केली. एकत्र निवडणूका लढवून निकाल  लागल्यानंतर युती तोडत शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी अभद्र शय्यासोबत केली. परिणामी महाराष्ट्रात जनाधार नसलेले सरकार सत्तेत आले. हे सरकार कधीही पडू शकते अशी भीती सत्ताधार्‍यांच्या मनात असल्यामुळे ते वारंवार  भाजप आमचे सरकार पाडणार, प्रसंगी तिन्ही पक्षातील आमदार फोडणार आणि आपले सरकार बनवणार अशी कोल्हेकुई करीत आहेत. प्रत्यक्षात मात्र हे सरकार अंर्तविरोधानेच कधीतरी पडेल अशी स्थिती आजतरी दिसते आहे.

या सरकारने सत्तासूत्रे हाती घेतली आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या मागे अडचणीवर अडचणी सुरु झाल्या आहेत. विशेषतः कोरोनाचे संकट फार भयावह आहे. आज सरकार सत्तेत असतानाही त्यांना परिस्थिती आटोक्यात आणणे कठीण झाले  आहे. या सर्व प्रकारात राज्याची तिजोरी पूर्णतः रिकामी झाली असून आजघडीला या सरकारजवळ कर्मचार्‍यांचे पगार देण्यासाठीही पैसा नाही अशी परिस्थिती आहे. कोरोनाच्या रुग्णांना भरती करण्यासाठी इस्पितळात जागाही नाहीत.  परिणामी ते रुग्ण एका रुग्णालयातून दुसर्‍या रुग्णालयात ‘बेड देता का हो बेड?’ अशी याचना करीत फिरत आहेत. भाजपचे ज्येषठ नेते आणि सध्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे राज्यभराचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेत  आहेत. त्यामुळे नेमकी परिस्थिती काय याची पुरेपूर जाणीव भाजपश्रेष्ठींना आहे.

अशा स्थितीत राज्यातील विद्यमान सरकारच्या तीन पायाच्या शर्यतीत एक पाय जर बाजूला झाला तर दोन पायांवर हे सरकार टिकणार नाही हे स्पष्ट चित्र दिसते आहे. अशावेळी मग कोणते पर्याय उरतात याचा विचार करणे गरजेचे आहे. एक तर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी आघाडी करून भाजपने सरकार बनवणे, किंवा शिवसेनेतील आणि इतर दोन पक्षातील काही आमदार फोडून त्यांच्या मदतीने सरकार बनवणे किंवा मग राज्यात राष्ट्रपती राजवट लावणे आणि  पुढील सहा महिन्यात निवडणूकांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करणे हेच प्रमुख पर्याय आज समोर दिसत आहेत.

यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याशी युती करणे हे भाजपला फारसे पटेल असे वाटत नाही. अशा परिस्थितीत सरकार आले ही तरी ते फार काळ टिकणार नाही. म्हणजेच आजचे मरण उद्यावर ढकलण्यासारखा हा प्रकार होईल. जर  राष्ट्रपती राजवट लावून पुन्हा मध्यावदी निवडणूकांना सामोरे जायचे म्हटले तर किमान सहा महिने राज्याचा कारभार हा नोकरशाहीच्या हातात असेल. सध्याच्या अडचणीच्या काळात असे करणे धोक्याचे ठरेल. पुन्हा सहा महिन्याने  निवडणूका घ्यायचा तर त्याचा सरकारी तिजोरीवर पडणारा भार हाही विचारात घ्यावा लागेल. सद्यस्थितीत राज्याची आर्थिक घडी विस्कटलेली असताना हा भार महाराष्ट्र कितपत पेलवू शकेल याचाही विचार व्हायला हवा. याच पद्धतीने  तिनही पक्षातील मिळून सुमारे 45 आमदार फोडायचे तर त्यांनाही राजीनामा द्यावा लागेल. पुन्हा त्या 45 जागांच्या निवडणूकांचा खर्च राज्याच्या डोक्यावर म्हणजेच पर्यायाने करदात्यांच्या खिशावर येऊन पडणार हे नक्की.

2014 मध्ये शिवसेना-भाजपचे पहिल्यांदा फाटले तेव्हापासून जी कटूता निर्माण व्हायला सुरुवात झाली ती तशीच वाढत राहिली. आजतर कटूता अगदी कळसापर्यंत पोहचली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. विशेषतः 2019 च्या  निकालानंतर शिवसेनेने भाजपशी धोकेबाजी केली असा भाजप समर्थकांचा ग्रह झालेला आहे. या पार्श्‍वभूमीवर दादांनी पुन्हा शिवसेनेसोबत जाण्याचा विषय काढल्याबरोबर हे सर्व दुखावलेले भाजपसमर्थक दादांवर तुटून पडले.त त्यात  वावग असे काहीच नाही. त्यांचा शिवसेनेबाबतचा सात्विक संताप या ट्रोलमधून स्पष्ट दिसतो आहे.

हा संताप विचारात घेत असतानाच आधीचे मुद्देही लक्षात घेतले पाहिजे. भाजप काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेल्यास जी टीका आज सेनेवर होते आहे तीच टीका उद्या भाजपवर होईल. जर दोन्ही पक्षातून आमदार फोडले (किंवा ते आमदार स्वतःहून बाहेर निघाले) तरीही भाजप टिकेचे लक्ष्य होणार हे नक्की. अशा परिस्थितीत राष्ट्रपती राजवट लावून कारभार नोकरशाहीच्या हातात देणे आणि राज्यातील जनतेला गैरसोईत ढकलणे हे कितपत उचित ठरेल? त्याचप्रमाणे सहा महिन्यानंतर निवडणूकांचा खर्च राज्यावर लादणे हे देखील अनुचितच ठरणार आहे. हे पर्याय महाराष्ट्राच्या दृष्टीने अहितकारकच ठरतील हे निश्‍चित. यासाठीही उद्या भाजपविरोधक भाजपलाच टिकेचा धनी बनवतील आणि सर्वसामान्य जनतेलाही ते पटू लागेल.

अशा पार्श्‍वभूमीवर चंद्रकांतदादांनी हा व्यवहारी विचार केलेला असू शकतो. जर या तीन पायांच्या शर्यतीत एक पाय बाजूला झाला तर सरकार कोसळेेल. अशावेळी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आघाडी करणे हे भाजपच्या तत्त्वात बसणार नाही. त्याचबरोबर राज्याला आर्थिक संकटात लोटणे हे देखील विरोधकांना भाजपची बदनामी करण्यासाठी दिलेले आयते कोलीत ठरेल. हाच विचार करून अशावेळी राज्याचे व्यापक हीत लक्षात घेत प्रसंगी काहीसे मनाविरुद्ध आजचा शत्रू  असला तरी दिर्घकाळचा मित्र असलेल्या आणि समान विचारधारेवर चालणार्‍या शिवसेनेसोबत काही काळ राहून त्यांचे सरकार टिकवून राज्यातील जनतेला समोर असलेल्या संकटातून बाहेर काढणे हाच विचार दादांनी केलेला असू शकतो.  अशावेळी बाहेरून पाठिंबा देऊनही ते सरकार टिकवू शकतात.

असा विचार जर चंद्रकांत दादांनी केला असेल तर माझ्या मते तरी तो आजच्या परिस्थितीत उचित ठरतो. इथे दादांनी उचलेले हे पाऊल शिवसेनेच्या हितासाठी नव्हे तर महाराष्ट्राच्या हितासाठी शत्रूशीही तात्पुरती तडजोड करण्याचे उचललेले पाऊल असेल याचाही विचार दादांवर टिका करणार्‍यांनी करावा इतकेच मला सुचवावेसे वाटते.


-अविनाश पाठक