आत्मनिर्भर होण्यासाठी स्वदेशी अँपची निर्मिती करा : नरेंद्र मोदी

July 05,2020

नवी दिल्ली : ५ जुलै - चिनी ऍप्सवर बंदी घातल्यानंतर, एक पाऊल पुढे टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला ऍप निर्मितीत आत्मनिर्भर होण्याचे आवाहन देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला व युवा पिढीला केले आहे. ‘आत्मनिर्भर भारत ऍप इनोव्हेशर चॅलेन्ज’मध्ये स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान समूहांनी सहभागी व्हावे, जेणेकरून भारतीयांना दुसर्‍या कोणत्याही देशाच्या ऍपवर अवलंबून राहावे लागणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी टि्‌वटरवर ही माहिती दिली. देशातील ऍप्लिकेशन डेव्हलपर्स व इनोव्हेटर्सला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी जागतिक दर्जाचे स्वदेशी ऍप तयार करण्याचे आव्हान दिले आहे, असे प्रसाद म्हणाले.

आपल्याला आता सर्वच क्षेत्रात आत्मनिर्भर व्हायचे आहे. आपण पुढाकारही घेतला आहे. शस्त्रास्त्रात आपण स्वयंसिद्ध झालो आहोत, मग ऍप्सवर आपण का इतर देशांवर अवलंबून राहायचे. कोण जाणे, कदाचित तुम्ही देशातच तयार केलेल्या काही ऍप्सच्या मी देखील मोहात पडेल, असा पंतप्रधानांचा संदेश आहे.

आज स्वदेशी ऍप तयार करण्यासाठी तांत्रिक आणि स्टार्टअप्स समुदायात मोठा उत्साह दिसत आहे. यामुळे हे ऍप तयार करण्याचे आव्हान आपण सादर केले आहे. स्टार्टअप्स समुदाय हे आव्हान नक्कीच स्वीकारेल, असा माझा विश्‍वास आहे.

तुमच्याकडे असे एखादे उत्पादन असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की, आपल्याकडे काही चांगले करण्याचा दृष्टिकोन आणि क्षमता आहे, तर तुम्ही स्वत:ला तंत्रज्ञान समुदायाशी संलग्न करा. रविशंकर प्रसाद यांचे मंत्रालय तुम्हाला यासाठी आवश्यक ते सहकार्य आणि मदत करण्यास तयार आहे. ‘अटल इनोव्हेशन मिशन’चीही तुम्हाला मदत होणार आहे. ‘व्होकल फॉर लोकल प्रॉडक्ट्‌स’ हाच आता आपला मंत्र राहणार आहे, असे मोदी म्हणाले.

आपल्याकडे तंत्रज्ञान क्षेत्रात आवश्यक असलेली दूरदृष्टी आहे आणि अशा प्रकारचे ऍप विकसित करण्यात आपण पूर्णपणे सक्षम आहोत, असा विश्‍वास ज्यांना आहे, त्या सर्वांनाच मी उपरोक्त आव्हान दिले आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील माझ्या तरुण मित्रांनी पुढाकार घ्यावा आणि ऍपमध्येही देशाला आत्मनिर्भर करावे.