आर्थिक मागासलेल्यांना स्वावलंबी बनविणे हीच आमची नीती : नितीन गडकरी

July 05,2020

 नागपूर : ५ जुलै -  समाजातील आर्थिक, सामाजिक मागासलेल्या गरीब, शेतकरी यांना केंद्रबिदू मानून त्यांना स्वावलंबी कसे बनवता येईल, तसेच ग्रामीण, कृषी, आदिवासी क्षेत्राचा विकास, उच्च तंत्रज्ञानाच्या आधारे आयात कमी व निर्यात वाढविणे, तरुणांच्या हाताला काम हीच आमची नीती आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील आत्मनिर्भर भारताकडे जाण्याचा हा मार्ग असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

भारत नीतीतर्फे आयोजित आत्मनिर्भर भारत या विषयावर गडकरी ई संवादाच्या माध्यमातून बोलत होते. कोरोना विषाणूने संपूर्ण जग संकटात आहे. सकारात्मकता आणि आत्मविश्‍वासाने यावर मात करायची आहे. पंतप्रधानांनी ५ ट्रिलियनची अर्थव्यवस्था आणि १00 लाख कोटींच्या पायाभूत सुविधांची घोषणा केली आहे. हे कठीण कार्य आहे. पण अशक्य नाही, असे सांगताना गडकरी म्हणाले, पंतप्रधानांनी या आव्हानात्मक स्थितीत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी २0 लाख कोटींचे पॅकेज सर्व क्षेत्राला दिले आहे. या पॅकेजमुळे अर्थव्यवस्थेला बळ मिळणार आहे. बाजारात खेळते भांडवल आल्याशिवाय मागणी व पुरवठा वाढणार नाही. देशातील उद्योगांमध्ये सार्वजनिक-खासगी व परकीय गुंतवणूक आणण्याची आवश्यकता आहे. त्याशिवाय अर्थव्यवस्थेला चालना मिळणार नाही, असेही ते म्हणाले.

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत दोन वर्षात १५ लाख कोटींचे रस्ते करण्याचे आमचे लक्ष्य आहे, तर दुसर्‍या बाजूला सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगांमध्ये फंड ऑफ फंडच्या माध्यमातून परकीय गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न असल्याचे सांगताना गडकरी म्हणाले, 'लेबर, लॉ, लँड, लॉजिस्टिक आणि लिक्विडिटी' या पाच गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. स्वातंत्र्यानंतर साम्यवाद, समाजवाद आणि भांडवलशाही या देशातील जनतेला स्वावलंबी, आत्मनिर्भर बनवू शकले नाही. पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या आर्थिक व सामाजिक चिंतनावर आधारित अंत्योदयाची संकल्पना हीच या देशाला आत्मनिर्भर बनवू शकणार आहे. आणि त्या संकल्पनेवर आधारित आमचे धोरण असले पाहिजे, असेही गडकरी म्हणाले.

कृषी, ग्रामीण, आदिवासी क्षेत्राच्या विकासासोबतच भारतीय आणि स्वदेशी वस्तूंना, तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे सांगताना गडकरी म्हणाले, आयात कमी होऊन निर्यात वाढली पाहिजे. कृषी क्षेत्रात सिंचन वाढले पाहिजे. बँकांना सकारात्मक राहून मदत केली पाहिजे. तंत्रज्ञानाचा विकास आणि परकीय गुंतवणूक, सर्व क्षेत्राच्या आत्मनिर्भरतेचा दृष्टिकोन ठेवून विकास करणे म्हणजेच आत्मनिर्भरतेचा मार्ग आहे. यासाठी सकारात्मकता, राजकीय इच्छाशक्ती, सर्व क्षेत्राचा समतोल विकास हाच स्वावलंबी होण्याचा व आत्मनिर्भरतेचा मार्ग असल्याचेही गडकरी म्हणाले.