बैलगाडीसह पुरात वाहून गेलेल्या आजोबा व नातवासह दोन महिलांचा मृत्यू

July 04,2020

वर्धा : ४जुलै - वर्धेत  दोन वेगवेगळ्या घटनात मोठ्या नाल्यांना आलेल्या  पुरात वाहून गेल्याने चार जणांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये एका मुलासह दोन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. सेवाग्राम पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

वर्धा तालुक्यातील धोत्रा येथील नारायण पोहाने हे बैलगाडीने सावली येथे निघाले होते. तेव्हा त्यांचा  नातू  वंदेश हिवरे (वय – १२) हा  देखील त्यांच्याबरोबर होता. शुक्रवारी रात्री जोरदार झालेल्या पावसामुळे गोजी शिवारातील मोठा नाला तुडुंब वाहू लागला होता, दरम्यान त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने बैलगाडी पुरात वाहून गेली, ज्यामध्ये या दोघांचीह मृत्यू झाला. आज सकाळी त्यांचे मृतदेह हाती लागले.

तर दुसऱ्या एका घटनेत सोनेगाव आष्टा मार्गावर नाल्याच्या पुरात दोन महिला वाहून गेल्याची घटना घडली. सोनेगाव येथील चंद्रकला लोटे व तळेगाव येथील बेबी भोयर या दोघी शेतातील कामे आटोपून परत निघाल्या होत्या., मात्र वाटेतील नाला ओलांडत असताना पाण्याचा जोर वाढल्याने दोघीही वाहून गेल्या, या दोघीचेही मृतदेह रात्रीच हाती लागले आहेत. सेवाग्राम पोलीस याप्रकरणी तपास करीत आहे.