लॉकडाऊन आणि मी लॉकडाऊनमुळे भविष्यात सर्वकंष परिवर्तन यावे अ‍ॅड. स्मिता सिंघलकर

May 22,2020

लॉकडाऊन आणि मी

कोरोनाची साथ आणि परिणामस्वरुप आलेले लॉकडाऊन यामुळे सर्वसाधारण कुटुंबांमध्ये अतिशय सकारात्मक परिवर्तन आले आहे. याच काळात घरातल्या लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच स्वावलंबनाची सवय लागली आहे. त्याचबरोबर आपण सर्वच आयुष्यात पैशाच्या मागे धावून एका जीवघेण्या रॅटररेसचे स्पर्धक झालो होतो. आज कोरोनामुळे आपल्या गरजा किती मर्यादित आहेत याची नव्याने जाणीव झाल्याने आपण रॅटरेसपेक्षा कौटुंबिक संबंधांना जास्त  महत्त्व द्यायला शिकलो आहोत. लॉकडाऊनचे हे झालेले फायदे बघता लॉकडाऊनचे काही प्रमाणात तरी मी समर्थनच करीन असे मत नागपुरातील ज्येष्ठ विधिज्ञ आणि महिला चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या अ‍ॅड. स्मिता सिंघलकर यांनी  व्यक्त केले आहे.

नागपूर इन्फोच्या लॉकडाऊन आणि मी या स्तंभात आज अ‍ॅड. स्मिता सिंघलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नागपूर इन्फोचे सल्लागार संपादक अविनाश पाठक यांनी त्यांचेशी संवाद साधला.

लॉकडाऊन जाहीर झाल्यावर पहिली प्रतिक्रिया काय होती असे विचारले असता अ‍ॅड. सिंघलकर म्हणाल्या की कोरोनाचा वाढता जोर बघता लॉकडाऊन आवश्यकच होते. मात्र रात्री 8 वाजता लॉकडाऊन जाहीर करायचे आणि लगेच रात्री  12 पासून लागू करायचे हे काही पटणारे नव्हते. सर्वसामान्यांना आपल्या दैनंदिन सोयी करण्यासाठी काही वेळ देणे अत्यंत गरजेचे होते. मात्र हा वेळ न दिल्याने सर्वसामान्यांची चांगलीच ससेहोलपट झाली. आज स्थलांतरितांचा जो प्रश्‍न  निर्माण झाला आहे तोही कदाचित योग्य असा मार्ग काढून टाळता आला असता त्यामुळे लॉकडाऊन जाहीर करताना पुरेसा वेळ द्यायला हवा होता असे मत अ‍ॅड सिंघलकर यांनी व्यक्त केले.

लॉकडाऊन 24 मार्चपासून सुरु झाले. 20 मार्चला माझी शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे मी घरात अडकूनच राहणार होते. त्यातही जवळजवळ महिनाभर जास्त हालचाल करायची नव्हती. लॉकडाऊनमुळे कोर्टाची कामे जवळजवळ बंद  होती. त्यामुळे हे लॉकडाऊन तसे माझ्या पथ्यावरच पडले. मात्र घरात कामाला येणार्‍या बाया थांबल्यामुळे माझे पती संदेश आणि दोन मुलांवरच घरातील सर्व जबाबदारी पडली. मात्र त्यांनीही स्वयंपाक करण्यापासून तर धुणीभांडी,   झाडूपोछा अशी सर्वच कामे तिघांनीही एकमेकांना सहकार्य करीत वाटून घेतली. सुमारे महिना आटोपल्यावर मीही जमेल त्याप्रमाणे या तिघांना मदत करायला सुरुवात केली. या काळात मी घरीच होते. मात्र व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सोय  उपलब्ध होती. त्यामुळे या काळात कायद्याच्या क्षेत्रात उपयोगी ठरणारा न्यूरोलिंगविस्टीक प्रॅक्टिस नामक अभ्यासक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या मदतीने पूर्ण केला. हा अभ्यासक्रम पाच दिवसाचाच होता.मात्र नंतर घरीच राहून त्याचा मला  सराव करता आला. या दरम्यान माझ्या काही नवीन पुस्तकांचे काम अर्धवट होते. ते प्रलंबित कामही मी मार्गी लावले. त्यामुळे लॉकडाऊननंतर नवीन पुस्तकाचा विचार करता येईल. याशिवाय एक दीर्घ श्‍वास नामक एक महिला अन्यायावर  आधारित व्हिडिओ फिल्मचेही काम मी केले. यात मराठीतील नामवंत कलाकार सहभागी झाले आहेत. 9 मे रोजी महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते या फिल्मचे लोकार्पण झाले.

याशिवाय व्हिडियो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मी काही वेबीनार्स मध्ये सहभाग घेतला आणि दोन वेबीनार्स मी स्वतः कंटन्टकटही केले. त्यात महिला अत्याचाराशी संबंधित एक सत्र होते. तर कायद्याच्या क्षेत्रात राहून वृत्तपत्रीय लेखन कसे  करता येईल यावरही एक वेबीनार आयोजित केला होता. या दोन्हींनाही चांगला प्रतिसाद मिळाला.

लॉकडाऊनमुळे गत दोन महिने आम्ही चौघेही घरातच आहोत. त्यामुळे सर्वच कामे एकत्रित होत आहेत. याचा परिणाम सर्वांमध्ये एक चांगले बाँडिंग निर्माण होण्यात झाला आहे हे वेगळे नमूद करायलाच हवे. कोरोनावर आजतरी औषध नाही. योग्य वेळी ते येईलही. मात्र तोवर आम्हाला कोरोनाच्या सोबतीनेच जगायची सवय करावी लागणार आहे. आमच्या व्यवसायात कोरोनामुळे जो बदल होतो आहे तो स्वागतार्हच म्हणावा लागेल. आज दररोज शाळेत जावे तसे आम्ही  तयार होऊन कोर्टात जातो, दिवसभर कोर्टात बसायचे, केस असेल तर जावून युक्तिवाद करायचा आणि संध्याकाळी घरी यायचे यात फक्त वकिलांचाच नाही तर न्यायाधीश, कर्मचारी, पक्षकार आणि साक्षीदारांचाही अकारण वेळ जात असतो. जर आम्ही ई-फायलिंगच्या मदतीने केस दाखल केली आणि घरूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या मदतीने युक्तिवाद केला तर आमचा वेळही वाचेल. हा वाचलेला वेळ अनेक सकारात्मक आणि विधायक कामांसाठी वापरता येऊ शकेल. माझ्या मते तर न्यायाधीशांनी एकाच दिवशी दोन्ही बाजूचे पक्षकार, साक्षीदार आणि वकील असे सर्वांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून एकत्र आणावे आणि एकेका दिवसात एकेका खटल्याचा निकाल लावावा. यातून सर्वांचाच वेळ वाचेल आणि झटपट न्याय मिळेल.

महात्मा गांधींनी स्वदेशीचा नारा दिला होता. मात्र आम्ही परदेशी ब्रॉन्डच्या मागे लागलो. आज आम्हाला पुन्हा स्वदेशीकडे यायला कोरोनाने भाग पाडले आहे. आता आमच्या जिवनशैलीत सर्वंकष बदल करणे आवश्यक असल्याचे या  कोरोनाने आम्हाला पटवून दिले आहे. हे बदल आम्ही स्वीकारले तर कोरोनाच्या संकटातून आणि नंतर येणार्‍या आर्थिक मंदीच्या संकटातूनही आम्ही बाहेर येऊ शकू हा विश्‍वास व्यक्त करीत अ‍ॅड. स्मिता सिंघलकर यांनी हा संवाद आटोपता  घेतला.

-अविनाश पाठक