झारखंडमधील सरकार पाडण्याची आपली लायकी नाही - चंद्रशेखर बावनकुळे

July 26,2021

नागपूर : २६ जुलै - झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचं सरकार पाडण्याचं षडयंत्र रचल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या कटात राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा हात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र, बावनकुळे यांनी हे आरोप फेटाळून लावले असून आपण कधीही झारखंडला गेलो नसल्याचा दावा केला आहे. झारखंड सरकार पाडण्याच्या प्रयत्नात राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव पुढं आलं आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीनं बावनकुळे यांचं नाव घेतल्याचं सांगितलं जातं. त्यामुळं खळबळ उडालीय. मात्र, हे आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेटाळले आहेत. आपण कधीही झारखंड राज्यात गेलो नाही आणि तिथलं सरकार पडण्याची आपली लायकी नाही, असं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. झारखंड सरकार पाडण्याचा कट रचल्याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. या तिन्ही आरोपींनी याबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. या कटात झारखंडचे तीन आमदार, दोन पत्रकार आणि काही मध्यस्थ सामिल होते, अशी माहिती या आरोपींनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. दिल्लीत तीन आमदारांची देवाणघेवाणाची डील झाली होती. यावेळी एक कोटी रुपये अॅडव्हान्स देण्याचंही ठरंल होतं. मात्र, हे पैसे न मिळाल्याने हे आमदार रांचीला पोहोचले होते. या डीलमध्ये भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि चरण सिंह यांचा समावेश होता, अशी कबुली या आरोपींनी दिल्यांचं वृत्त दैनिक हिंदुस्ताननं दिलं आहे. या डीलमध्ये भाजपचा महाराष्ट्राचा एक आमदार असल्याचं आरोपी अभिषेक दुबे, अमित सिंह आणि निवारण प्रसाद महतो यांनी सांगितलं होतं. मात्र, बावनकुळे हे आमदाराच नसल्याने त्यांचा या प्रकरणात हात नसावा, असंही सांगितलं जात आहे.
अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींपैकी दोघे सरकारी कर्मचारी आहेत. तर एक जण दारूचा व्यवसाय करतो. पोलिसांनी रांचीच्या एका हॉटेलमधून या तिघांना ताब्यात घेतलं होतं. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर कॅश जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी या तिंघांविरोधात भादंवि कलम 419, 420, 124 अ, 120 ब, 34 आणि पीआर अॅक्ट 171 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.