सिद्धूंनी माफी मागितल्याशिवाय मी त्यांना भेटणार नाही : अमरिंदर सिंग

July 21,2021

चंदीगड: २१ जुलै- काँग्रेस हाय कमांडने नवज्योतसिंग सिद्धू यांना पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष केले आहे आणि दीर्घकाळ चाललेला वाद संपल्याचे मान्य केले आहे, पण तसे होताना मात्र, दिसत नाही. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात सुरू असलेल्या वाद अद्याप कायम आहे. सिद्धूंनी माफी मागितल्याशिवाय मी त्यांना भेटणार नाही , असे अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे.


मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पंजाबचे प्रभारी हरीश रावत यांच्यासमोर नवज्योतसिंग सिद्धू यांनी माफी मागण्यासाठी अट घातली होती. सिद्धू यांनी त्यांच्यावर केलेल्या अपमानकारक वक्तव्यांबद्दल जाहीरपणे माफी मागावी, असे त्यांनी म्हटले. मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचे माध्यम सल्लागार रवीण ठुकराल यांनी पंजाबमधील सध्या सुरू असलेल्या वादाबाबत सिद्धू आणि अमरिंदर सिंग यांच्यात झालेल्या बैठकीच्या चर्चांना फेटाळून लावले. त्यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, नवज्योतसिंग सिद्धू यांनी अमरिंदरसिंग यांना भेटण्यासाठी वेळ मागितल्याची बातमी पूर्णपणे चुकीची आहे. कोणतीही वेळ मागितलेली नाही. सिद्धू यांच्या वृत्तीत कोणताही बदल नाही. सिद्धू हे सोशल मीडियावर केलेल्या अपमानजनक वक्तव्यांबद्दल जोपर्यंत मुख्यमंत्र्यांची जाहीरपणे माफी मागत नाहीत तो पर्यंत कोणतीही भेट होणार नाही. मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा विरोध डावलून पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदी नवज्योतसिंग सिद्धू यांची पक्षश्रेष्ठींनी नियुक्ती केली आहे, हे विशेष.