ट्रकचालकाची पोलीस स्टेशन समोर आत्महत्या

June 15,2021

नागपूर : १५ जून  - नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी पोलीस स्टेशनच्या समोर एका ट्रक चालकाने त्याच्याच ट्रकला गळफास लावून आत्महत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे चोरीच्या आरोपाखाली काल रात्री कोंढाळी पोलीस स्टेशनमध्ये त्याच ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि पोलीस त्याचा शोध घेत होते. अशोक जीतूलाल नागोत्रा (वय ४०) असे त्या ट्रकचालकाचे नाव आहे.

९ जूनला अशोक नागोत्रा यांच्या ट्रक मधून नागपूर जिल्ह्यातील सातनवरी शिवारातील बाजारगाव येथील पेट्रोल पंप जवळून तेलाचे पिंप चोरीला गेले होते. घटनेच्या दिवशी अशोक नागोत्रा त्यांच्या ट्रक मध्ये तेलाचे पिंप घेऊन येत असताना ही घटना घडली होती. या संदर्भात ट्रान्सपोर्ट मालकाच्या तक्रारीवरून अशोक नागोत्रा विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र आज त्याच ट्रकला दोरी बांधून त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास केला जात आहे.

ट्रान्सपोर्ट मालकाने यासंदर्भात पाच दिवसानंतर म्हणजे सोमवारी कोंढाळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी अशोक नागोत्रा यांच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत अशोक नागोत्रा सापडले नाही. आज सकाळी मात्र अशोक नागोत्रा पोलीस स्टेशन समोर पोलिसांनी आणून ठेवलेल्या त्यांच्याच ट्रकला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आले.