राममंदिर गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेनेही घेतली उडी

June 15,2021

मुंबई : १५ जून - 'राममंदिर  कार्य हे राष्ट्रीय अस्मितेचे कार्य आहे. या कार्याची कोणी जाणीवपूर्वक बदनामी करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. अयोध्येतील राममंदिर हे रामभक्तांचा त्याग, संघर्ष व बलिदानातून उभे राहिले. हाच इतिहास आहे. एखाद्या घोटाळ्याचा डाग त्या मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना  त्यात हस्तक्षेप करावाच लागेल' असं म्हणत शिवसेनेनं  तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

अयोध्येतील राम भव्य मंदिर जमीन व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचे वृत्त समोर आल्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. याच मुद्यावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.
अयोध्येतील प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर व्हावे ही तर जगभरातील तमाम हिंदूंचीच इच्छा आहे. त्या राममंदिरासाठी हिंदूंना मोठा लढा त्यांच्याच हिंदुस्थानात द्यावा लागला. अयोध्येच्या भूमीवर साधू, संत, करसेवकांनी रक्त सांडले. शरयू नदी हिंदूंच्या रक्ताने लाल झाली. फक्त 10 मिनिटांपूर्वी दोन कोटींना घेतलेली जमीन राममंदिर निर्माण न्यासाने 18.5 कोटींना विकत घेतल्याचा स्फोट संजय सिंह यांनी केला. या सर्व प्रकरणाची सीबीआय आणि ईडीकडून चौकशीची मागणी समोर आल्याने राममंदिर निर्माणामागे नक्की काय गडबड सुरू आहे, असा संशयाचा धूर निघाला आहे' असं सेनेनं म्हटलं आहे.

'अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर साधारण साठ एकर परिसरात उभे राहात आहे. त्यासाठी जमीन संपादन करावी लागत आहे. बाबा हरिदास यांनी ही जमीन सुलतान अन्सारी आणि रवी मोहन तिवारी यांना विकली. त्यानंतर त्यांनी ही जमीन रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला विकली. हा व्यवहार फक्त दोन-पाच मिनिटांत झाला. बाबा हरिदास यांनी ही जमीन दोन कोटींना विकली. पुढच्या काही मिनिटांत हीच जमीन राममंदिर ट्रस्टला 18.5 कोटींना विकली. काही मिनिटांतच जमिनीचा भाव दोन कोटींवरून 18.5 कोटी कसा काय होऊ शकतो? असा सवाल सेनेनं उपस्थितीत केला.

'अयोध्येचे महापौर ऋषिकेश उपाध्याय व ट्रस्टचे विश्वस्त अनिल मिश्रांच्या उपस्थितीत हा व्यवहार झाला. मुख्य म्हणजे 17 कोटी रुपये संबंधितांच्या खात्यावर जमा करण्यात आले. हे सर्व प्रकरण नक्की काय आहे? त्याविषयी संभ्रम आहे. तो संभ्रम दूर करण्याचे काम रामजन्मभूमीचे प्रमुख महासचिव चंपत राय यांनाच करावे लागेल' असंही सेनेनं म्हटलं आहे.

'अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री योगी महाराजांच्या हस्ते संपन्न होताच विश्व हिंदू परिषदेचे चार हजारांवर स्वयंसेवक देशभरात घरोघर फिरून सामान्यांकडून राममंदिर निधीसाठी पावत्या फाडत होते. त्यातूनही कोटय़वधी रुपये जमा झाले. शिवसेनेनेही एक कोटीचा निधी मंदिर कार्यासाठी दिलाच आहे. अयोध्येतील राममंदिर उभारणीचे काम व त्यामागचा व्यवहार पारदर्शक, प्रामाणिक पद्धतीने व्हावा. रामभक्तांच्या श्रद्धेस तडा जाईल असे काही घडू नये ही अपेक्षा असतानाच जमीन व्यवहाराचे संशयास्पद प्रकरण समोर आले. ते खरे की खोटे याचा लगेच खुलासा झाला तर बरे' अशी मागणीही सेनेनं केली.