राममंदिर प्रकरणी गैरव्यवहाराचा आरोप करणाऱ्या खा. संजय सिंग यांच्या घरावर हल्ला

June 15,2021

नवी दिल्ली : १५ जून - अयोध्येत जमीन खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करणारे आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. संजय सिंग यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. यावेळी संजय सिंग यांनी भाजपाला जाहीर आव्हान देत कितीही गुंडगिरी केली तरी मंदिराचा पैसा चोरी होऊ देणार नाही असं म्हटलं आहे. संजय सिंग यांनी ट्रस्टने जमीनखरेदीत घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. दोन कोटींची जमीन अवघ्या पाच मिनिटांत १८.५ कोटी रुपयांना ट्रस्टने खरेदी केली असून, या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय व सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी करण्याची मागणी संजय सिंग यांनी केली आहे.

संजय सिंग यांच्या आरोपांनंतर देशभरात खळबळ माजली असून याचवेळी त्यांच्या घऱावर हल्ला झाला आहे. संजय सिंग यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “माझ्या घरावर हल्ला झाला आहे. भाजपावाल्यांनी कान उघडे ठेवून ऐकावं, कितीही गुंडगिरी केली तरी प्रभू श्रीरामाच्या नावे बनणाऱ्या मंदिराचा पैसा चोरी होऊ देणार नाही. त्यासाठी माझी हत्या झाली तरी बेहत्तर”.

राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम आदमी पक्ष आणि समाजवादी पक्षाने केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मात्र, हे आरोप ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सविस्तर निवेदन प्रसिद्ध करून फेटाळले आहेत. खुल्या बाजारातील किमतीपेक्षा कमी दराने ट्रस्टने जमीन खरेदी केली असून, राजकीय द्वेष पसरवण्यासाठी बिनबुडाचे आरोप होत असल्याचा दावा चंपत राय यांनी निवेदनाद्वारे केला आहे. याप्रकरणी चौकशीची मागणी कॉंग्रेससह विरोधकांनी केली आहे.

लखनौमध्ये ‘आप’चे खासदार संजय सिंग आणि समाजवादी पक्षाचे नेते पवन पांडे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन ट्रस्टने जमीनखरेदीत घोटाळा केल्याचा आरोप केला. दोन कोटींची जमीन अवघ्या पाच मिनिटांत १८.५ कोटी रुपयांना ट्रस्टने खरेदी केली असून, या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय व सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी करण्याची मागणी संजय सिंह यांनी केली. त्याबाबत चंपत राय यांनी निवेदन प्रसृत केले. ‘‘गेले १०० वष्रे आमच्या वर कुठले ना कुठले आरोप झाले आहेत. महात्मा गांधी यांची हत्या केल्याचाही आरोप आमच्यावर केला गेला. अशा कोणत्याही आरोपांची आम्ही पर्वा करत नाही. या नव्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे याची शहानिशा करून प्रत्युत्तर दिले जाईल,’’ असे चंपत राय यांनी पत्रकारांना सांगितले.