१७ वर्षीय बालिकेने केली बापाचीच हत्या

May 18,2021

नागपूर : १८ मे - सततच्या शारीरिक व मानसिक जाचाला कंटाळून एका १७ वर्षीय विधिसंघर्ष बलिकेने आपल्या सावत्र बापाची हत्या केली. ही घटना  दुपारी १२ वाजतादरम्यान हिंगणा पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या सावळी या गावात घडली.

ज्ञानेश्वर दामाजी गडकर (वय ६0) असे मृतकाचे नाव असून, त्याची पहिली पत्नी त्याला सोडून गेल्यानंतर सुमारे पंधरा वर्षांपूर्वी त्याने वंदना हिच्याशी गंधर्व विवाह केला होता. वंदनासुद्धा विवाहित होती. तिला पहिल्या पतीपासून एक मुलगी होती. काही दिवस सावळी येथे एकत्रित राहिल्यानंतर मृतक ज्ञानेश्वर हा वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात खापरी येथे एकटाच राहायला गेला होता. त्यातही अधूनमधून तो सावळी येथे वंदनाकडे यायचा. येथे आल्यानंतर तो पत्नी वंदना व सावत्र मुलीला सतत त्रास द्यायचा. सोमवारी सकाळी ११ वाजता तो सावळीला दारू पिऊन आला. सावत्र मुलीला अंगलट करून त्याने त्रास द्यायला सुरुवात केली. पत्नीलासुद्धा ऐकत नव्हता. मुलीला हे सहन न झाल्याने भांडण झाले. यात मुलीने लाकडी दांडा उचलून ज्ञानेश्वरच्या तोंडावर मारला. घाव बसताच तो घराच्या अंगणातच खाली पडला. रक्तस्राव जास्त झाल्याने त्याचा मृत्यू झाला. हिंगणा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सरीन दुर्गे, पोलिस निरीक्षक सपना क्षीरसागर, हवालदार मडावी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. पोलिसांनी १७ वर्षीय विधिसंघर्ष मुलीला ताब्यात घेतले.