कुख्यात गुंडाने पोलिस ठाण्यातच घातला गोंधळ

February 20,2021

यवतमाळ, 20 फेब्रुवारी : पोलिस दफ्तरी हिस्ट्रीसीटर म्हणून नोंद असलेल्या अट्टल गुंडाने यवतमाळ शहरात प्रचंड धुमाकूळ घातला. वाईन शॉपमध्ये दारू व रोख रकमेची लुटालूट, बाजारपेठेत, उभ्या कारची तोडफोड केली. त्यानंतर चक्क शहर पोलिस ठाण्यात जाऊन दोन संगणकांचे नुकसान करीत थेट ठाणेदारांच्या खुर्चीचा ताबा घेेतला. या घटनेने व्यापार्‍यांसह पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

चाँद झब्बू कालीवाले असे या गुंडाचे नाव आहे. धामणगाव रोडवरील कॉटन मार्केट चौक परिसरापासून त्याने तोडफोड व धुमाकूळ सुरु केला. तो अतिमद्य प्राशन केलेल्या अवस्थेत होता. त्याने अप्सरा टॉकीज मार्गावरील एका दारू दुकानात गल्ल्यातील रकमेची लुटालुट केली. तेथून दारूचा बॉक्सही लुटला. यावेळी त्याच्याजवळ धारदार शस्त्रे होती. त्यानंतर तो बाजारपेठेतील टांगा चौकात पोहोचला. तेथे त्याने धुमाकूळ घातला.इंदिरा गांधी मार्केट परिसरात एका कारची तोडफोड केली.त्यानंतर तो थेट शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला. बहुतांश पोलिस कर्मचारी शिवजयंती बंदोबस्ताच्या निमित्ताने शहरात तैनात असल्याने पोलिस ठाण्यात फारसे मनुष्यबळ नव्हते.

हीच संधी साधून तो सीसीटीएनएस प्रणाली असलेल्या कक्षात गेला. तेथे महिला कर्मचारी तैनात होती. तिच्याशी बोलत असतानाच त्याने दोन संगणक फोडल्याचे सांगितले. त्यानंतर तो ठाणेदारांच्या कक्षात शिरला. ठाणेदार धनंजय सायरे रजेवर आहेत. गुंड शेख चाँद हा थेट ठाणेदारांच्या खुर्चीत बसला. त्यानंतर तो निघून गेला. त्याला पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले. गुंडाच्याया दहशतीमुळे व्यापार्‍यांनी शहर पोलिस ठाणे गाठले.याबाबत गुन्हा दाखल झालेला नव्हता. मात्र पोलिस गुंड शेख चांदची झाडाधडती घेत होते. चोरी, घरफोडीसारखे गुन्हे शिरावर असलेला गुंड थेट पोलिस ठाण्यात तोडफोड करुन ठाणेदारांच्या खुर्चीची ताबा घेतो,या घटनेने स्थानिक पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे.